मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात; आठ वाहने एकामेकांवर आदळली , १८ पोलीस, १२ बांगलादेशी जखमी

बांगलादेशी घुसखोरांना पुण्याकडे नेताना अपघात

By Raigad Times    19-Jun-2025
Total Views |
KHOPOLI
 
खोपोली | बांगलादेशी घुसखोरांना ठाण्याहून पुण्याकडे नेत असताना, पोलिसांच्या वाहनांसह सात ते आठ वाहने एकमेकांवर आपटून विचित्र अपघात झाला. यामध्ये १८ पोलीस व १२ बांगलादेशी घुसखोर जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर हा अपघात झाला.
 
अपघातावर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मंगळवारी, १८ जून रोजी ठाणेकडून ४० बांगलादेशी घुसखोरांना पुणे एअरपोर्टवर नेण्यात येत होते. पहाटेच्यावेळी भातान बोगद्यात पोलीस वाहनांचा ताफा आला असताना, या वाहनांना अपघात झाला. यामध्ये पाच ते सहा पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस, एक टेम्पो, एक पोलिस स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश होता.
 
या अपघातामुळे भातान बोगद्यात गाड्यांचा खच पडून वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमी पोलिसांना तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाड्या एकमेकांवर चढल्या. तर अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षींच्या आधारे तपास करत आहेत.
 
या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासनतास ताटकळत थांबावे लागले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेत रस्ता मोकळा केला, तरी वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यास बराच वेळ लागला. अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. ४० घुसखोरी बांगलादेशी आरोपींवर कारवाई केल्यानंतर बांगलादेशात पाठवण्यासाठी ठाणे पोलिसांचा ताफा पुणे विमानतळाकडे जात असताना या ताफ्यात पोलीस उपनिरीक्षक २ व १८ पोलीस हवालदार तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक २ व १५ महिला हवालदार होते. भाताण बोगद्याजवळ पुणे लेनवर अपघात हा झाला असून या अपघाताची रसायनी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.