कर्जत | तालुयातील कर्जत खोपोली रस्त्यावरील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वर्णे गावच्या हद्दीत जमीन विकसित करणार्या कल्पतरू बिल्डरने खड्डे खोदले आहेत. त्यातील एका खड्ड्यात पडून कर्जत शहरातील गुंडगे गावातील आदिवासी वाडीमधील संजय महादू पाटील या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्पतरू बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गुंडगे ग्रामस्थांनी केली आहे.
कर्जत खोपोली रस्त्यावर पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत वर्णे गावाच्या हद्दीत कल्पतरू बिल्डरकडून शेकडो एकर जमीन विकसित केली जात आहे. गृहसंकुल बांधणार्या बिल्डरने तेथे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटार खोदले आहेत. ती गटारे पक्की बांधण्यात आली असून त्या ठिकाणी अनेक चेंबर खोदले आहेत. या खोदलेल्या एका चेंबरमध्ये कर्जत गुंडगे गावातील रहिवासी संजय महादू पारधी हे रात्रीच्या अंधारात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. संजय पारधी हे मजुरी करतात आणि ते सायंकाळी काम उरकून १६ जून रोजी रात्री वर्णे येथे येत होते.
अंधार आणि पाऊस यामुळे संजय पारधी यांना रस्त्याच्या बाजूने असलेल्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे तोल गेला आणि त्या चेंबरच्या खड्ड्यात संजय पारधी पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुंडगे गावातील आदिवासी वाडीमधील अनेक ग्रामस्थ अपघातस्थळी पोहचले आणि त्यांनी संजय पारधी यांचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर या दुर्घटनेची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली.
कर्जत पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील हे तत्काळ तेथे पोहचले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर स्थांनिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्जत गुंडगे येथील आदिवासी ग्रामस्थांनी संजय पारधी यांच्या अपघातास कल्पतरू बिल्डर जबाबदार असल्याचा आरोप करत, बिल्डरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.