अलिबाग | भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. शनिवारी, २१ जून रोजी मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
दिलीप भोईर यांनी शेकापक्षाकडून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतीपद भूषवले आहे. तीन वर्षांपूर्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यावर भाजपने रायगड जिल्हा उपाध्यक्षपदाची तसेच अलिबाग मुरुड निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अलिबाग मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवसेनेकडून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापकडून चित्रलेखा पाटील आणि अपक्ष म्हणून दिलीप भोईर अशी तिरंगी लढत झाली.
या निवडणुकीत भोईर यांना लक्षवेधी ३३ हजार ५०० मते मिळाली. तिसर्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली होती. मात्र पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे भोईर यांना भाजपने पाच वर्षांसाठी निलंबीत केले. विधानसभा निवडणूक संपल्यापासून दिलीप भोईर हे भाजपचे दरवाजे पुन्हा एकदा खटखटवायला लागले होते. मात्र त्यांना यश आले नाही. पक्षाची शिस्त न पाळणार्या पदाधिकार्यांबाबत निर्णय भाजपसाठी राज्यपातळीवरचा आहे.
जेव्हा पक्ष पातळीवर निर्णय होईल तेव्हा तो सर्वांसाठी होईल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. शेवटी दिलीप भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जून रोजी अलिबागमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे. विशेष म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात दिलीप भोईर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेच भोईर आता आमदार दळवी यांच्याच पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरत आहे.