आर्थिक घोटाळे बाहेर काण्याच्या धमक्या , गोगावले-तटकरेंमध्ये वाद पुन्हा पेटला!

By Raigad Times    16-Jun-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गोगावले यांनी तटकरेंची सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर, पालकमंत्रीपदासाठी गोगावले हे हपापलेले असल्याची टिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी "झी २४ तास” या खाजगी वाहिनीच्या एका कार्यक्रमात विविध विषयावर भाष्य केले.
 
त्यांनी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुनील तटकरे यांनी मला पाडण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केला, असा पुर्नरुच्चार भरत गोगावले यांनी केला. तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी ‘सेटलमेंट’ केली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली.
 
माझ्यासाठीसुध्दा सुनील तटकरेंनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती, असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही तुमची एकच सीट निवडून दिली, सगळीकडे पडझड होत असताना आम्ही पूर्ण ताकदीने साम, दाम, दंड, भेद सगळ्यासहीत जर मदत केली असेल मग आमच्या अपेक्षा का नसाव्यात? त्यांनी का मोठे मन करु नयेत? असा सवाल गोगावले यांनी केला आहे. यावेळी पालकमंत्रीपदाबाबतची अपेक्षा त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. सुनील तटकरे यांनी मला १०० टक्के पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचे कारण ही माझी चौथी टर्म आहे. २३० ग्रामपंचायती माझ्या मतदारसंघात मोडतात. त्या सगळ्याच्या सगळ्या मी कागदावरती न बघता तोंडपाठ सांगू शकतो.
 
ग्रामपंचायती तर सांगेनच, पण ग्रामपंचायतीत येणारी गावे, ५ गावे, ७ गावे, १२ गावे यांची नावेदेखील सांगू शकतो. त्याचे कारण आमचा तसा टच आहे. मी जेव्हा २००९ ला उभा राहिलो तेव्हा जनतेने १४ हजार फरकाने निवडणूक दिले. दुसर्‍या वेळी २१ हजार फरकाने निवडून दिले. तिसर्‍या वेळा मी २१ हजार ४५० मतांच्या फरकाने जिंकलो आणि आता एवढी अटीतटीची लढत असताना मला २६ हजार २१५ च्या फरकाने विजय मिळाला. आम्ही काम करतो. आमचे नेते १६-१८ तास काम करत असतील तर आम्ही १४-१५ तास काम केले आहे, असे सांगत रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.
 
सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा यावेळी गोगावलेंनी दिला. यावर राष्ट्रवादीनेदेखील पलटवार केला आहे. गोगावले हे पालकमंत्रीपदासाठी हपापलेले आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे. रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा ‘थ्री इडियट्स’ असा उच्चार करतानाच, गोगावलेंचे आर्थिक घोटाळे उघड करु, असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला आहे.

mumbai 
 
पालकमंत्रीपदासाठी गोगावले हपापलेले - आनंद परांजपे
सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा गोगावलेंनी दिला. यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. रायगडमधील ‘थ्री इडियट्स’ म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी गोगावलेंचा समाचार घेतला. तसेच गोगावलेंचे आर्थिक घोटाळे उघड करु, असा इशारा परांजपे यांनी दिला अहे. गोगावले हे पालकमंत्री पदासाठी हपापलेले आहेत, असा हल्लाबोल परांजपे यांनी केला आहे.

mumbai 
...त्या क्षणी आम्ही राजीनामा देऊ, नाहीतर त्यांनी तोंड... 
"आमचा घोटाळा काढाल त्या क्षणी आम्ही राजीनामा देऊ. नाहीतर त्यांनी तोंड काळं करावं”, असे प्रत्युत्तर मंत्री भरत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. "माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत काय झाले असेल? तर दाखवावे. खिशातील पैसे टाकून आम्ही कामे केलीत” असे ते म्हणाले. रायगड जिल्हा सोडून सगळं सुरळीत असल्याचेही गोगावले यांनी म्हटले आहे.