पनवेलमध्ये शिवसेना अ‍ॅक्टीव्ह मोडवर , शिवसेना नेते अनंत गीते यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

By Raigad Times    16-Jun-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भगवा फडकावयाचा आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच आम्ही लढणार... आम्ही जिंकणार... हे ब्रीदवाक्य घेऊन घराघरात जावे, म्हणजे आपला विजय निश्चित आहे, असे मत शिवसेना नेते माजी खासदार अनंत गीते यांनी व्यक्त केले. रविवारी (१५ जून) कामोठे येथील आगरी समाज हॉल येथे ठाकरे शिवसेनेच्या ‘मिशन पनवेल महानगरपालिका’ निष्ठावंत पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने, शिवसेना उपनेते बबन पाटील, जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, राज्य संघटक विलास व्हावळ, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, प्रदीप ठाकूर, दीपक घरत, अवचित राऊत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, महिला आघाडी तालुका संघटिका सौ. अनिता डांगरकर, उपतालुका संघटिका मीना सदरे, उपमहानगर संघटिका संचिता राणे व अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना अनंत गीते यांनी सांगितले की, आपल्याला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे.
 
यासाठी कोणतीही तडजोड करण्यास आपण तयार राहिले पाहिजे. महाविकास आघाडी होईल किंवा नाही होईल हा नंतरचा भाग आहे. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु ही निवडणूक सर्व बाजूने आपल्याला लढायची आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागून तशा प्रकारची बांधणीला सुरूवात करायची आहे, तसेच आगामी पनवेल महानगरपालिकेच्या वाढीव प्रॉपर्टी टॅक्स विषय तसेच लेोकनेते दि.बा.पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यात यावे यासाठी शासनाविरोधात एल्गार मोर्चा आयोजित करणार असल्याचे गीते यांनी सांगितले.
 
तर यावेळी बोलताना शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ माने यांनी सांगितले की, पनवेल परिसरात शिवसेनेला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत भगवा फडकेल, असा विश्वास वाटतोय. यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला सारुन एकत्र या व मशाल चिन्ह हे घराघरात पोहोचवा असे आवाहन केले. शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी सुद्धा आवेशपूर्ण भाषणात लोकांचा संपर्क वाढवा, मतदारांकडे जावून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या, लवकरच पनवेल महानगरपालिका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल शहरात करण्यात येईल. येथे लोकांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. तर जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनीसुद्धा शिवसैनिक ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज असून सर्व प्रकारचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी आदींची जोरदारपणे बांधणी सुरू आहे.
 
निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसैनिक उत्सुक असून पनवेलमधील अनुकूल वातावरण पाहता निश्चितच भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सर्वांनी एकजुटीने व उद्धवजींचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे. निवडणुका या जिंकण्यासाठी असतात. त्यामुळे विरोधकांची पळतीभुई करण्यासाठी एकत्र रहा, असे आवाहन त्यांनी केले.