वावोशी | रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, चौक आणि वावोशी भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात आता रिपब्लिकन सेना आणि पँथर आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सात दिवसांत जर गुटखा विक्री थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
गुटख्यासारख्या मादक पदार्थांच्या व्यसनामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणांचे जीवन आणि कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची स्थिती आहे. खालापूर तालुक्यातील शाळा व कॉलेज परिसरात खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असून, प्रशासन मात्र डोळे झाकून बसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन दिले आहे. जर प्रशासनाने आठ दिवसांच्या आत ठोस कारवाई केली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा थेट इशारा पँथर आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुशील जाधव, रिपब्लिकन सेना रायगडचे उपाध्यक्ष सुफियान मुकादम, पनवेल शहर अध्यक्ष जमील पठाण, सलमान मुकादम व आशिष खंडागळे यांनी दिला आहे.