जावयाचा सासर्‍यावर चाकू हल्ला; सासरा गंभीर जखमी

By Raigad Times    14-Jun-2025
Total Views |
 mahad
 
महाड | जावयाने सासर्‍यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री महाड तालुक्यातील कोळसे आदिवासीवाडी येथे निदर्शनास आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार संतोष किसन जाधव (वय ४५, राहणार कोळोसे आदिवासीवाडी, तालुका महाड) यांनी आपल्या जावयाला मुलीला का मारले? असा जाब विचारल्यामुळे चिडलेल्या जावयाने सासर्‍यांना शिवीगाळ करून त्यांच्या छातीत चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
 
याप्रकरणी सासू इंदिरा संतोष जाधव वय ४० यांनी बुधवार ११ जून २०२५ रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी जावई रामदास वसंत वाघे (रा.कोळसे आदिवासीवाडी तालुका महाड) यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे व विद्या राऊत करीत आहेत.