धक्कादायक | महाड, रोह्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार , वेगवेगळ्या दोन प्रकरणांत तीनजण अटकेत

By Raigad Times    13-Jun-2025
Total Views |
 mahad
 
धाटाव | रायगड जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करुन लैगिंक अत्याचार करणार्‍या दोघांना पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. रोहा आणि महाड या तालुक्यात या दोन वेगवेगळ्या घटना पुढे आल्या आहेत. महाड येथील प्रकरणात अश्लिल व्हिडीओ पसरवण्याची तर रोह्यात अश्लील मेसेज व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.
 
रोहा तालुक्यातील उसर गावातील एका १४ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरु केले होते. या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ओमकार पिंपळे (वय २५ रा. तळवली ता. रोहा) याने अश्लिल मेसेज केले होते. हे मेसेज देवेश सावंत (वय २५ रा. नागोठणे) या तरुणाच्या हाती लागले. देवेश आणि पीडित मुलीचे आधी प्रेमसंबध होते. पण गावात या विषयाची माहिती झाल्यानंतर दोघांनीही प्रेमसंबंध तोडले होते.
 
असे असताना, देवेश सावंत याने सदर पिडीत मुलीला, ओमकार पिंपळेने पाठविलेले अश्लिल मेसेज मी व्हायरल करेन, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करुन उसर गावातील एका बंद अवस्थेत असलेल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ‘याबाबत कोणाला सांगितलेस तर तुला मारून टाकेन’ अशी धमकीदेखील त्याने दिली. उसर गावात सुट्टीनिमित्त आलेल्या या पीडित मुलीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली. त्यानंतर घरच्या मंडळींनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचार, विनयभंग आदी गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना बुधवारी रात्री अटक केली आहे.
 
mahad
 
महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 
महाड | महाड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवून तिचे अश्लिल व्हिडीओ बनवले. त्यानंतर तिला ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
 
महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाड येथील २१ वर्षीय स्वराज तांबे याने एका १६ वर्षे ४ महिन्यांच्या पिडीत मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत जुलै २०२२ रोजी आदर्श नगर बिरवाडी येथील बहिणीच्या घरी घेऊन नेऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध केले तसेच ११ जून २०२५ रोजी या पिडीत मुलीला धमकी देऊन बिरवाडी येथून मोटारसायकलने रायगड रोडवरील एका गावामध्ये नातेवाईकांचे घरी नेली.
 
तिथे तिला मारहाण करत तिचे कपडे जबरदस्तीने काढून शारिरीक संबंध करण्याचा प्रयत्न केला. तसेच मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ बनवून ‘तू कशी राहत नाहीस ते बघतो’ असे म्हणत सदरचे व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीत बालिकेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाड आणि रोह्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे स्थानिक परिसरात खळबळजनक उडाली आहे. या दोन्ही प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.