पनवेल | एसीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून सेल्स ऑफिस आगीच्या भक्षस्थानी गेल्याची घटना पळस्पे फाटा येथील साई वर्ल्ड सिटी इमारतीच्या आवारात घडली आहे. पळस्पे फाटा येथे साई वर्ल्ड सिटी ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या आवारात सेल्स ऑफिस आहे.
या ऑफिसमधील एसीजवळ सकाळी साडे नऊच्या सुमारास शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे ऑफिसला आग लागली. या आगीचे वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या पनवेल आणि नवीन पनवेल अग्निशमन दलास समजली. त्यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेतली. तेव्हा स्मोक व्हेंटिलेशन होण्याकरता तडा गेलेल्या काचा तोडण्यात आल्या. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
यासाठी नवीन पनवेल येथील उप अग्निशमन अधिकारी अतुल सकपाळ, अग्निशमन विमोचक प्रमुख मंदार म्हात्रे, यंत्र चालक श्रीकांत आढाऊ, अग्निशामक अविनाश भालेराव, विशाल राऊत प्रतिक गाडगे, पल्लवी जागले, पनवेल अग्निशमन दलाचे वैभव ओंबासे, मन्सूर, सुदीप ठाकूर, तनय पडवळ, कृष्णा नरवटे, एकनाथ बागूल, मितेश तारेकर आदींनी प्रयत्न केले.