बाबा निघाला ठकसेन; अनेकांना चुना , ४२ लाखांसह एक थार आणि जेसीबीदेखील पाडला पदरात

अलिबाग पोलिसांनी केली तिघांना अटक

By Raigad Times    30-May-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | अलिबाग येथे दर गुरुवारी तो गोरगरीबांसाठी अन्नछत्र चालवायचा... त्यामुळे कोणासाठी तो अन्नदाता होता, कोणासाठी देवदूत, कोणासाठी मसिहा होता तर कोणासाठी तो जादूटोणा करुन तारणहार बाबा. दोन वर्षांपासून त्याचे हे धोकाधडीचे दुकान सुरु होते. समाजसेवेचा आव आणणार्‍या त्या ‘भोंदूबाबा’चे बिंग अखेर फुटले असून त्याच्यासह तीनजणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
 
या बाबाने एका ठेकेदारासह तीनजणांना ४२ लाखांचा चुना लावला आहे. एक थार, एक जेसीबी अशी वाहने बेमालूपणे त्याने आपल्या पदरात पाडून घेतली आहे. पनवेल कळंबोली येथे राहणार्‍या गणेश कडव या ठेकेदाराने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ठेकेदारीची कामे केली होती, पण काम पूर्ण झाल्यावरही त्यांना वेळेवर पैसे मिळत नव्हते. अनेक मोठ्या रकमा अडकून पडल्या होत्या, ज्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता. अशातच, अलिबागजवळील एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीत कामासाठी आलेला असताना, त्याला महेश मोरे या ‘बाबा’ची माहिती मिळाली.
 
जानेवारी २०२४ मध्ये हा ठेकेदार पहिल्यांदा महेश मोरे या भोंदूबाबाला अलिबाग ठिकरुळ नाका येथे असलेल्या त्याच्या तथाकथित आश्रमात भेटला. यावेळी त्याने आपली आर्थिक अडचण तपशीलवार सांगितली. मोठ्या रकमा कशा अडकल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे कुटुंब कसे आर्थिक संकटात आहे, हे त्यांनी बाबासमोर मांडले. सर्व ऐकून घेतल्यानंतर मोरे याने यातून मार्ग काढण्याचा आव आणत "आपल्याला एक प्रयोग करुन बघावा लागेल, यानंतर काय ते सांगतो” असे म्हणत सदर ठेकेदाराला, बाबाने घरात स्थापन केलेल्या दगडावर उभे केले.
 
यानंतर कौल लावण्याचा फार्स आणत फास आवळायला सुरुवात केली. बाबाने एक साधा पांढरा सुती दोरा घेतला. त्यांचे छोटे छोटे तुकडे केले. "हे तुकडे जोडून परत दोरा तयार झाला, तर समजा. "तुमच्यावरील संकट दूर करण्याची शक्ती माझ्यात आहे आणि मी तुम्हाला मदत करु शकेन; पण जर दोरे जुळले नाहीत, तर मी काहीही करु शकणार नाही.” यादरम्यानच्या काळात सदर ठेकेदाराला मोठ्या कुशलतेने आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्या दोर्‍याच्या तुकड्यांना एका विशिष्ट केमिकल लावले आणि आपली मूठ बंद केली.
 
थोड्या वेळाने त्याने मूठ उघडली, तर त्या तुकड्यांची पुन्हा एक पूर्ण लांब दोरी तयार झाली होती! हे पाहून ठेकेदार पूर्णपणे प्रभावित झाला होता. त्याला या बाबाजवळ दैवी शक्ती असल्याचे पटले होते. ठेकेदार पूर्णपणे प्रभावित झाल्याचे पाहून मोरेने लगेचच त्यांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. ‘अडचणीतून बाहेर येण्यासाठी एक अनोखे होमहवन करावे लागेल. हा होम आपोआप पेटेल आणि त्यानंतर तुमच्यावरील सर्व संकट दूर होईल, अडकलेले पैसे परत मिळतील’ असे या बाबाने सांगतानाच, होमहवनसाठी मोठा खर्च येईल, असेही सांगितले. दोरीच्या चमत्काराने भारावलेल्या ठेकेदाराने मोरेच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला.
 
त्यांनी होमहवनची तयारी केली आणि आवश्यक ती रक्कम बाबाला दिली. होमहवनही केले; पण आर्थिक समस्या काही सुटली नाही. यानंतर ठेकेदार पुन्हा एकदा मोरेबाबाकडे गेले. अजूनही अडचण सुटली नाही, याची माहिती बाबाला दिली. यावेळी "तुमच्यावर कोणीतरी मोठी करणी केलेली आहे. त्यामुळे तुमच्या घरात कांचनगंगा (कांचनगंगा नावाच्या झाडाचे खोड) ठेवा” असे सुचवले. ‘कांचनगंगा’साठी सुमारे ४० लाख रुपयांची मागणी या बाबाने केली. मात्र यावेळी त्या ठेकेदाराने असर्थता दर्शवली. शेवटी ही रक्कम दहा लाखांवर आली. ‘कांचनगंगा’ ठेकेदाराच्या घरात आली. बरेच महिने झाले; पण ठेकेदाराच्या समस्या काही सुटल्या नाहीत.
 
जानेवारी २०२४ पासून सुरु झालेले हे सर्व नाटक परवापर्यंत सुरु होते. एव्हाना, आपली फसवणूक झाल्याचे ठेकेदार गणेश कडव यांच्या लक्षात आले होते. अखेरीस त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोपर्यंत त्यांच्याकडून ३८ लाख रुपये, नितीन पाटील याच्याकडून १ लाख २९ हजार रुपये, विघ्नेश सुर्वे यांच्याकडून २ लाख २५ हजार रुपये तसेच एक थार गाडी व एक जेसीबी अशी वाहने या बाबाने पदरात पाडून घेतली होती.अलिबाग पोलिसांनी याप्रकरणी योगेश्वर मोरे (वय ४३), त्याची पत्नी अपूर्वा महेश मोरे तसेच मानस पुत्र मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे (वय २४) आणि सागर यशवंत कुंड (वय २४, रा. चेंढरे, ता. अलिबाग) या चौघांवर गुन्हे दाखल करत, तिघांना अटक केली आहे.
 
न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावत, पुढील तपासासाठी पोलिसांना वेळ दिला. या काळात, त्यांच्याकडून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे? आणि त्यांनी हे पैसे कुठे ठेवले आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत. महेश मोरे याने रत्नागिरी आणि चौल दत्त मंदिर येथेही काहीतरी गडबड केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अन्य काही लोकांचीही या मोरे नावाच्या भोंदूबाबाने फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. त्यादिशेने आपला तपास सुरु असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली.