माथेरान नेरळ मिनीट्रेन सलग तिसर्‍या दिवशी बंद

By Raigad Times    29-May-2025
Total Views |
 alibag
 
कर्जत | पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन अतिवृष्टीमुळे बुधवारी (२८ मे) सलग तिसर्‍या दिवशी बंद ठेवण्यात आली आहे. २६ मेपासून सलग तीन दिवस मिनीट्रेनच्या नेरळ-माथेरान दरम्यानच्या सर्व फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गाची देखभाल करणार्‍या आयडब्लूआय विभागाकडून या मार्गाची पाहणी करण्यात आली असून, लवकरच मिनीट्रेनच्या नेरळ माथेरान नेरळ मार्गावरील वाहतुकीबद्दल निर्णय होणार आहे.
 
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये येणार्‍या लाखो पर्यटकांची आवडती मिनीट्रेन या भागातील अतिवृष्टीमुळे दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत बंद असते. मात्र यावर्षी अवकाळी तर आता मौसमी पावसामुळे तात्पुरत्या स्वरुपात फेर्‍या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
 
२५ मे रोजी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने २६ मे रोजी डोंगरातून जाणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन रद्द करण्यात आली होती. त्यानंतर हवामान खात्याने २७ मे रोजी पुन्हा एकदा ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्याने मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे २७ मे रोजीची नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावरील सर्व फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या.