अवैध होर्डिंगविरोधात , ठाकरे युवासेनेची अतिरिक्त आयुक्तांना भेट

By Raigad Times    28-May-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना - युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवासेना विस्तारक विनय सातले यांच्या सूचनेनुसार अवैध होर्डिंगच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांची युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शिष्टमंडळाने भेट घेतली.
 
वाढत चाललेल्या राजकीय व व्यावसायिक जाहिरातींच्या स्पर्धे त अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेस आणि पोस्टर्सचा विळखा पनवेलच्या सौंदर्यावर, शिस्तीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करत आहे. घाटकोपर, पुणे आणि कल्याणमध्ये अवाढव्य बॅनर कोसळून झालेल्या जीवित तसेच आर्थिक हानीच्या घटना ताज्या असतानाही पनवेल शहरात महाकाय होर्डिंग्जना जाहीरपणे अभय मिळत आहे.
 
या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून जागोजागी अवैधरित्या केलेली बॅनरबाजी रस्त्यावरही चालणार्‍या लहान वाहनांनाही धोका निर्माण करत आहेत. तसेच अनाधिकृत बॅनरच्या माध्यमातून महापालिकेचा लाखोचा महसूल बुडत असून पालिका कर्मचार्‍यांचा जाहिरात कंपन्यांना अजिबात धाक राहिलेला नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी पराग मोहिते यांनी विचारणा करताना सांगितले की, आर्थिक वर्ष २०२४ - २५ मध्ये महापालिकेने किती अनाधिकृत बॅनरवर कारवाई केली? तसेच किती फौजदारी गुन्हे दाखल केले?
 
आजपर्यंत महापालिकेने किती अनाधिकृत होर्डिंग्ज काढले आणि ते उभे करणार्‍या जाहिरातदार/व्यक्तींवर कोणती कारवाई केली? ४० फुटांपेक्षा अधिक मोठे होर्डींग्ज कोणत्या निकषांवर उभे करण्यास परवानगी देण्यात आली? त्यासाठी महापालिकेने परवानगी दिली नसल्यास आजवर कारवाई का करण्यात आली नाही? यावेळी चर्चेदरम्यान युवासेनेने वरील सर्व विषयांचा गांभीर्याने निर्णय घेऊन तातडीने ४० फुटांपेक्षा जास्त मोठे होर्डिंग तातडीने काढणे, आदी मागण्या केल्या.
 
सोबतच अनधिकृत बॅनर तसेच होर्डिंग वर केलेल्या कारवाईचा तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्याची मागणीही युवा सेनेने केली. या बैठकीला महाराष्ट्र वाहतूक सेना राज्य चिटणीस विलास कामोठकर, शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष महेश गुरव, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, आदी उपस्थित होते.