नवीन पनवेल | पनवेल येथून जेएनपीटीच्या दिशेने जाणार्या ट्रेलर चालकाने रस्त्यात अचानक ट्रेलर थांबवल्याने पाठीमागून येणारी कार ट्रेलरवर धडली आणि मोठा अपघात झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून कारचालकासह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रेश्मा रवींद्र तोरस्कर (४६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
राकेश रवींद्र तोरस्कर (२५), गितेश गोपाळ कुलये (३२) व स्नेहा राजेंद्र जाधव (२०) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. तोरस्कर कुटुंबीय संगमेश्वर येथील आपल्या मूळ गावी गेले होते. त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या कारने मुंबईत परतत होते. त्यांची कार रेश्मा यांचा मुलगा राकेश तोरस्कर चालवत होता.
त्यांची कार पनवेल जेएनपीटी मार्गावर पुष्पक नगर जवळ आली असताना हा उपघात झाला. दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी ट्रेलरचालक शंभू प्रेमचंद कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.