मुरुड जंजिरा | मुरुड ग्रुप ग्रामपंचायत उसरोलीमधील वाळवटी ग्रामस्थांना गेल्या ७ वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरीही प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. याच्या निषेधार्थ गुरुवारी (२२ मे) ग्रामस्थांनी मुरुड पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात आला.
ठेकेदाराला शिक्षा झाली पाहिजे, वाळवटी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, पाणी आताच सोडा नाहीतर या ठिकाणी मरुन जाऊ, अशा घोषणांनी या ठिकाणी महिलांचा आक्रोश पहायला मिळाला. तद्नंतर मुरुड तहसीलदार कार्यालयातील प्रांगणात यशवंत पाटील, इन्तिखाब खतीब, शब्बीर खतीब, शौखत नाखावाजी, शैलेश पाटील, नजीर नाखावजी यांनी उपोषणाला सुरुवात केली.
यावेळी दिनेश मिनमिने, मनोज कमाने, अरविंद गायकर, भरत बेलोसे, यशवंत पाटील, रविकुमार मुंबईकर, आजीम हुर्जुक, शैलेश पाटील, साजीत कळवसकर, अर्शद मुकरी, मकबुल खतीब, नजीर नाखावजी, मनोज पाटील, मुबश्शीर फकी, जुनेद शमराजकर, सिराज बोदले, आब्दन नाखवाजी आदिंसह शेकडो महिला उपस्थित होत्या. वाळवटी गावासाठी २०१७- २०१८ मधील पेयजल योजनेंतर्गत ७५ लाख, दलित वस्तीच्या माध्यमातून १० लाख, जलजीवन मिशन अंतर्गत ४४ लाख मंजूर झाले. एकूण १ कोटी २० लाख एवढा खर्च करुनही गाव पाण्यापासून वंचित आहे.