रायगडात मराठी शाळांना विद्यार्थी मिळण्यासासाठी शिक्षकांची धडपड

By Raigad Times    23-May-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची अवस्था मागील काही वर्षांपासून पटसंख्येअभावी बिकट होताना दिसत आहे. अनेक शाळा बंदही पडल्या आहेत. त्यामुळे शाळा आणि नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू झाली आहे. यावर्षी नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांकडे वळविण्यासाठी काही शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
 
आता मुलांना मराठी शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षक घरोघरी जावून करताना दिसताहेत. एक काळ असा होता की जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत होती. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
 
शिक्षकांवर टाकलेली अशैक्षणिक कामे, त्याचा काही शिक्षकांनी घेतलेला गैरफायदा, सातत्याने बदलत गेलेली शिक्षण पद्धत आणि महत्वाचे म्हणजे पालकांचे नोकरी व्यवसायासाठी स्थलांतर अशा बर्‍याच कारणांमुळे मराठी शाळांची पटसंख्या घसरू लागली. आज बहुतांशी शाळांमध्ये हाताच्या बोटावर मोजावीत इतकीच मुले शिल्लक राहिली आहेत. असे भयानक चित्र असतानाही शिक्षक पटसंख्या वाढावी म्हणून तितकेसे प्रयत्न करताना दिसत नव्हते.
 
आता आपली नोकरी टिकवण्याबरोबच गरीब पालकांना आधार देण्यासाठी शिक्षकांनी पटसंख्या वाढवून शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच आपल्या शाळांमध्ये विद्यार्थी यावेत, पालकांनी मराठी शाळेतच मुलांना प्रवेश घ्यावा, यासाठी जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळा यांच्यातील फरक सांगणारी माहिती देण्यास सुरू केलेआहे. या माध्यमातून मराठी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मेरीटच्या आधारे निवड झालेले शिक्षक, सर्व शासकीय योजनांचा लाभ, मध्यान्ह भोजन योजना, प्रवेशासाठी कोणतीही शुल्क नाही, वर्षभर कसलेही शुल्क नाही, आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब या बाबी पालकांना समजावून सांगत आहेत. त्यासाठी गृहभेटींवर भर देण्यात आला आहे.
 
याउलट खासगी शाळेत मात्र महागडा गणवेश स्वतःच खरेदी करा, पाठयपुस्तके स्वतःच खरेदी करा, कमी अनुभवी शिक्षक, शासकीय योजनांच्या लाभाचा अभाव , मध्यान्ह भोजन आहार योजना नाही, प्रवेश फी सतत वाढणारी, सतत फीची मागणी, शिस्तीच्या नावाखाली केवळ दडपण असा फरक दाखवला जात आहे. आता विचार कसला करताय, आपल्या मुलाचा प्रवेश आजच निश्चित करा, अशी सादही घातली जात आहे.
शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? याची माहिती घेतली. त्यानुसार शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. - उदय गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक