तळा येथे मुख्यालयी न राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा; शिवसेनेची मागणी

By Raigad Times    23-May-2025
Total Views |
 tala
 
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
 
तालुक्यासाठी उपविभाग कार्यालय आणि शाखा कार्यालय असे दोन विभाग आहेत. उपविभाग कार्यालयात उपकार्यकारी अधिकारी-१, कनिष्ठ अभियंता-१, उच्चस्तर लिपीक, निमस्तर लिपिक- १, प्रधान तंत्रज्ञ-१, कंत्राटी कामगार- १ अशी एकुण सहा पद आहेत तर शाखा कार्यालयात सहाय्यक अभियंता -१ प्रधान तंत्रज्ञ-१, वरिष्ठ तंत्रज्ञ- २, तंत्रज्ञ- ४, कंत्राटी कामगार- ७, अशी पदे आहेत.
 
जवळपास १२ हजारच्या वर ग्राहक आहेत. डोंगराळ दुर्गम भागात वारंवार विद्युत खंडित होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. तक्रार करायची झाली तर कर्मचारी नसतात. तसेच एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्वरित संपर्क साधला जात नाही.