पनवेल | उलवे येथील अलवीना खान या महिलेची तिच्याच नवर्याने सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्यात वाद होता. विशेष म्हणजे सुपारी घेणारीदेखील महिलाच होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तीनजणांना अटक केली असून दोन हल्लेखोर फरार आहेत.
अलवीना अदमली खान ही पती किशोरसिंग राजपूत याच्यासोबत उलवे, सेक्टर-५ मधील विजय लक्ष्मी टॉवरमध्ये राहत होती. अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग दोघेही त्याच परिसरात मेडीकल शॉप चालवत होते. अलवीना मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून ती रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास उलवे येथील घरी परतत असताना तिच्या घरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर अज्ञात मारेकर्याने तिच्या गळ्यावर धारदार चाकुने वार करुन पलायन केले होते.
यात अलवीनाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उलवे पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुध्द विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-२ कडूनसुध्दा या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात अलवीना आणि तिचा पती किशोरसिंग या दोघांमध्ये काही वर्षापासून आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद सुरु असल्याचे तसेच दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन गुन्हे शाखेने किशोरसिंग याची उलटतपासणी केली.
सुरुवातीला त्याने उडवा- उडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेचे सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली. घटस्फोट देत नसल्यामुळे हत्या अलवीना हिने किशोरसिंगला व्यवसायासाठी १५ लाख रुपये दिले होते. सदर पैसे ती किशोरसिंग याच्याकडे मागत होती. त्यातच अलवीनाचे दुसर्या व्यक्तीसोबत संबंध जुळल्याने किशोरसिंगने अलवीनाकडे घटस्फोटाची मागणी केली होती.
मात्र, पैसे दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे तिने किशोरसिंगला बजावले होते. त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होता. १५ लाख रुपये दिल्यानंतरदेखील अलवीना घटस्फोट देणार नसल्याची भीती किशोरसिंग याला होती. त्यामुळेच त्याने सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हत्येसाठी ७ लाखांची सुपारी...
पोलिसांनी केलेल्या तपासात किशोर सिंग याने अलवीनाची हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणार्या अलिशा त्यागी या महिलेला ७ लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील ५ लाख रुपये त्याने दिले होते, हत्या झाल्यानंतर उर्वरित २ लाख रुपये देण्याचा व्यवहार त्यांच्यामध्ये ठरला होता.
त्यानुसार अलिशा त्यागी हिने तिची सहकारी डिंपल हिच्या ओळखीतून पंजाब येथून एका मारेकर्याला बोलावून घेतले होते. त्यानेच अलवीनावर पाळत ठेवून तिची भररस्त्यात गळा चिरुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग राजपूत, अलिशा धनप्रकाश त्यागी (वय ३८) आणि डिंपल चरणजीत फत्तेसिंह कौर उर्फ डिंपल (वय ३४) या तिघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी फरार दोघा मारेकर्यांचा शोध सुरु केला आहे.