मुरुड जंजिरा | कल्याण भरारी पथकातील एजन्सी व मुरुडमहावितरण कंपनी अधिकारी व कर्मचारी यांनी मुरुड बाजारपेठ येथील फर्निचर व इलेट्रॉनिस दुकानातील व घरातील वीज मीटरची तपासणी केली असता. या घरासाठी व व्यापारासाठी लावण्यात आलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले.
त्यामुळ महावितरण कंपनी मुरुड विभागाच्या प्रभारी सहाय्यक अभियंता सतीश खरात यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप डालू व उपकार्यकारी अभियंता मुरुड कृष्णात सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्यात वीज चोरीप्रकरणी विद्युत कायद्याच्या १३५ व १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ मे रोजी कल्याण भरारी पथकातील एजन्सीमधील कर्मचारी व मुरुड महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे मुरुड बाजारपेठ येथील दुकानातील व घरगुती मीटरची तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान महावीर फर्निचर व इलेट्रॉनिस दुकानामध्ये व वरती राहत असलेल्या दुमजली घरामध्ये अनधिकृत वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. प्रत्यक्ष वीज मीटर तपासणी करीत असताना घरातील व दुकानातील वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे सदरील वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
दुकानातील वीज चोरी दंड सुमारे १ लाख ९५ हजार व घरातील वीज चोरी दंड सुमारे सहा लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुरुड महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी पत्रकरांना माहिती देताना सांगितले की, मुरुड शहर व ग्रामीण भागातील जनतेने वीज चोरी करू नये. दोन्ही मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष वीज वापरानुसार विद्युत कायदा २००३ कलम १३५ व १३८ नुसार दंड देण्यात आला आहे. महावितरणचे कार्यक्षेत्र माणगाव असल्याने तिथे गुन्हा दाखल होत असतो परंतु तपासासाठी तो मुरुड पोलीस ठाण्यात वर्ग होणार असल्याची माहिती यावेळी सूर्यवंशी यांनी दिली.