रोहा | रोहा तालुक्यातील रोहा बस स्थानक ते चणेरा मार्गावर भरदिवसा एका शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या धाडसी मुलीने प्रसंगावधान दाखवत, चालत्या गाडीवरुन उडी मारली आणि थेट रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अलीम आयुब कर्जीकर (वय ६०, रा.मोर्बा) याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेने रोहा तालुक्यात खळबळ उडाली आहे.चणेरा येथील एक शाळकरी मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी रोहा बस स्थानकात उभी होती.
याचवेळी अलिम कर्जीकर त्याची स्कुटी घेऊन तेथे आला. ‘मीसुद्धा चणेरा येथे चाललो असल्याने पटकन मी चणेरा येथे सोडतो’ असे सांगून त्याने मुलीला स्कुटीवर बसण्यास सांगितले. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती स्कुटीवर बसली. गाडी म्हाडा कॉलनी येथे रोहा चणेरा मार्गावरील सीएनजी पेट्रोल पंपापुढे आली. यावेळी संधी साधून अलीम कर्जीकरने मुलीला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे मुलीने तात्काळ त्याला गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र अलीमने गाडी न थांबवला, गाडीचा स्पीड वाढवला. गाडीचा वेग वाढविल्याने मुलीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिला तात्काळ लक्षात आले की तो तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रसंगावधान दाखवत, कसलाही विचार न करता मोठ्या धाडसाने स्वतः चा जीव वाचविण्यासाठी या मुलीने चालत्या गाडीवरून उडी मारली व थेट रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाणे गाठून तिने कर्जीकर विरोधात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करत, रोहा पोलिसांनी अलीम कर्जीकरला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक मारुती पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार महेंद्र दामा शिंद व तपासीक अंमलदार स्वप्निल म्हात्रे हे काम पाहत आहेत. दरम्यान, ही बातमी रोहा तालुक्यात पसरताच खळबळ उडाली. भरदिवसा रोहा-चणेरा मार्गावर घडलेल्या या थरारक घटनेने पालकांमधून चिंता व्यक्त केली आहे. महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.