महाड | राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्तेतील मित्रपक्षांमध्ये रायगड जिल्ह्यात असलेली वादाची भडास, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या होमग्राऊंडवर म्हणजेच महाडमध्ये जाऊन काढली. भय दाखविण्याचे दिवस गेले, असा इशारा देतानाच, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने कशाप्रकारे काम केले? याचा लेखाजोखाच तटकरे यांनी मांडला.
तसेच लोकसभेतील ६० हजार मतांचा हिशोब द्या, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, आ. शेखर निकम, सुभाष निकम, अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे बोलायला उभे राहिले आणि चांदे मैदानावर अक्षरशः शब्दांचे फटाके फुटायला लागले.
त्यांच्या मुखातून निघणार्या शब्दरुपी ठिकर्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर बरसत होत्या. स्नेहल जगताप आणि त्यांच्या सहकार्यांनी लोकसभेला प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे काम केले. त्यामुळे लोकसभेला आपल्याला केवळ साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इमानदारीने काम केले. महायुतीची पूर्णपणाची ताकद आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या (आ.गोगावले) मागे उभी केली होती.
‘विरेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो’ असे म्हणत तटकरे यांनी मतदानाचे गणितच यावेळी मांडले. लोकसभेला मला साडेतीन हजारांचे मत्ताधिक्य आणि जे विधानसभेला निवडून आले ते २६ हजार मतांनी निवडून आले. महाड मतदारसंघात राष्ट्रवादीची ३० हजार ब्रँडेड मते आहेत, असे गोगावलेच प्रत्येक सभेत सांगत होते. माझ्या पक्षाचे एकही मत त्यांना नाही मिळाले, असे ते आरोप करत आहेत, तसे गृहीत धरु, नाही मिळाले.
म्हणजे २६ हजार अधिक ३० हजार असा ६० हजार मतांचा दगा लोकसभेला त्यांनी आपल्याला दिला, असे मी म्हटले तर काय आपली अवस्था होईल? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे. मी संयमी आहे; पण कोणी वेडेवाकडे वागणार असेल तर चालणार नाही. राजकारणामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. अदितीची पालकमंत्री म्हणून निवड मुख्यमंत्र्यांनी केली. याच बिरवाडीच्या फाट्यावर अश्लाघ्य शब्दांत त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. या सुनील तटकरेने त्यावर ‘ब्र’ देखील काढला नाही. गोरेगावच्या सभेतदेखील त्याच पध्दतीचे बोलले गेले.
तरीही मी काही बोललो नाही. आम्ही काय पाप केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्नेहलला मतदान करा, असे एकाही मतदाराला सांगितले नाही. तसे त्यांनी जर दाखवून दिले तर राजकीय संन्यास घेईन, असे आव्हानच खा.तटकरेंनी दिले आहे. अन्यथा तुमची ६० हजार मते लोकसभेला कुठे गेली? हेदेखील तुम्हाला सांगावे लागेल. गोगावलेंच्या सांगण्यावरुन बाबुशेठ खानविलकर यांच्यावर कारवाई केली; पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीवर्धनमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत बसले होते, याचीही आठवण तटकरे यांनी करुन दिली.
गोगावले यांच्या नॅपकीनची नक्कल!
महाड येथे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री गोगावले यांचा नामोल्लेख टाळत तोंडसुख घेतलेच; परंतू भाषणाच्या शेवटी गोगावले यांची केलेली नक्कल रायगडात चर्चेचा विषय ठरली. भाषणाच्या शेवटी तटकरे यांनी गोगावले यांच्या नॅपकीनची नक्कल केली. नॅपकीन आपल्या काखेत व खांद्यावर टाकत उपस्थितांना नमस्कार करत तटकरेंनी आपल्या भाषणाचा शेवट केला. यावेळी व्यासपीठावर बसलेल्या मंत्री अदिती तटकरे यांनाही हसू आवरता आले नाही. तर उपस्थितांमध्येदेखील चांगलीच खसखस पिकली.
लोणेरे | स्नेहल जगताप यांना मदत करा, असे कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही पदाधिकार्याला फोन करून सांगितले नाही तर त्यांनी तळोशीच्या येथील रंगूआईचे फुल उचलावे. नाहीतर मी उचलतो. आम्ही अभ्यासपूर्व लिस्ट काढली. त्या गावागावामधून आम्हाला रिपोर्ट आणि आकडेवारी मिळाली. जर आम्ही खोटे बोलत असलो तर आमचे वाटोळे होईल आणि ते जर खोटे बोलत असतील तर त्यांचे वाटोळे होईल. मी नेहमी परखड बोलतो. माझ्या नॅपकीनमध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. खांद्यावर नॅपकीन ठेवल्याने तो पडतो आणि काखेत तो व्यवस्थित बसतो. मी काय काल परवा नॅपकीन वापरत नाही. अनेक वर्षे नॅपकीन वापरतो आहे. मला नॅपकीनची सवय झाली आहे. तुम्हाला जर सवय करायची असेल तर नॅपकीन कुठे आणि कसा ठेवायचा? याची आम्ही ट्रेनिंग देऊ. आम्हाला वाटलं नव्हतं, तटकरे एवढे नकलाकार असतील. पाऊस उघडल्यानंतर एखादा कार्यक्रम लावू त्यांचा, असेदेखील मंत्री भरत गोगावले म्हणाले.