नागोठणे | नागोठणे शहरात विविध भागांत दोन ते तीन दिवसांपासून फिरणार्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने बुधवारी (२३ एप्रिल) दिवसभरात लहान मुलांसह सुमारे सतरा जणांवर हल्ला करुन, त्यांना चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
या कुत्र्याला पकडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी पथक तयार केले असून, रात्रभर शोध मोहीम घेतल्यानंतरहा हा कुत्रा न सापडल्याने दहशत कायम आहे. नागोठणे शहरात मोकाट पिसाळलेल्या अवस्थेत फिरत असलेल्या कुत्र्याने बुधवारी हिंसक रुप धारण केले. बुधवारी दिवसभरात कोळीवाडा, रामनगर, मिरानगर, मोहल्ला परिसर, स्व. बाळासाहेब ठाकरे वसाहत शांतीनगर यांसह विविध भागात रस्त्यावरुन चालणार्या तसेच दुचाकीवरून जाणार्या सुमारे सोळा ते सतरा नागरिकांना चावा घेत धुमाकूळ घातला आहे.
यामध्ये शहरातील विविध भागातील दोन ते तीन लहान मुलांचा समावेश आहे. पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेत जखमी केलेल्या या सर्वांवर नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले तर यातील काही गंभीर दुखापती झालेल्यांना अधिक उपचारार्थ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य शिरसाट सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी येथील वनखात्याकडे त्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याला शोधून त्याला जेरबंद करण्यासाठी मदत मागितली; मात्र वनखात्याकडे आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने टेमघरे यांनी त्या कुत्र्याला पकडण्यासाठी गुरुवारी (२४ एप्रिल) शोध पथक तयार केले.
या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी संपूर्ण शहरात शोध मोहीम सुरू केली. मात्र शोध पथकाकडून रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवूनही शुक्रवारी (२५ एप्रिल) सायंकाळपर्यंत पिसाळलेला मोकाट कुत्रा काही हाती लागला नाही. त्यामुळे शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम होते.