नवी मुंबई | मुलगा अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटमध्ये अडकल्याने नवी मुंबईतील प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर हे किल्ला गावठाण येथे राहत होते.
शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते तळमजल्यावर आले. तेथील त्यांच्या कार्यालयात त्यांनी स्वतः च्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब समजल्यानंतर त्यांच्या पुतण्याने याबाबतची माहिती एनआरआय पोलिसांनी कळवली.
याबाबत अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी सांगितले की, गुरुनाथ चिंचकर यांनी नऊ एमएमच्या बंदुकीतून गोळी झाडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. त्यांचा मुलगा अंमली पदार्थ तस्करीमध्ये अडकला आहे, याचे शल्य त्यांना होते. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असे बोलले जात आहे.