म्हसळा | श्रीवर्धन शहरालगत असलेल्या एसटी आगाराच्या आवारात २० एप्रिल रोजी दोन युवकांच्या गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर झटापट झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण तालुयाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हे प्रकरण केवळ वादापुरते न राहता टोळी संघर्षाच्या दिशेने गेल्याचे संकेत मिळाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील इतर तालुयांमधून काही युवक गाड्यांमधून श्रीवर्धनमध्ये दाखल झाले होते.
या गटांचा स्थानिक युवकांशी वाद उफाळून आल्याने राडा झाला. घटनेदरम्यान काही हत्यारांचा वापर झाल्याचे बोलले जात आहे. या गाड्यांमध्ये काही शस्त्रास्त्रे असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. संबंधित वाहने अद्याप श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या आवारात उभी असल्याचे पहायला मिळते. या वादावादीदरम्यान काही व्यक्ती किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

नागरिकांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळी आढळलेले दांडके एकत्र करून सुरक्षित स्थळी हलवले. या प्रकरणात दोन्ही गटांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १९१(१), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गटात मेटकर्णी येथील रोहित मोहिते, ओंकार गाडे, विकी चव्हाण, भीमराव मोहिते, राहुल मोहिते यांच्यासह इतर काही युवकांचा समावेश असून, दुसर्या गटात निलेश चव्हाण, राहुल चांदोरकर, अक्षय चव्हाण, रामदास चव्हाण, रुपेश पवार, मयूर जाधव व काही इतर युवकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर काही स्थानिक पत्रकार माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांना सहकार्य करत चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती दिली जाईल, असे सांगून संयम बाळगण्याचे आवाहन केले. दरम्यान, या घटनेचा संपूर्ण तपशील सीसीटीव्ही फूटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे उलगडू शकतो. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकार्यांकडून करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनीदेखील या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी, अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे. शहरात अशा प्रकारच्या टोळी वादांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर पावले उचलावीत, हीच वेळेची गरज आहे.