लाल मातीची तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले , कर्जत तहसीलदारांची धडक कारवाइ

...मात्र रिकामे ट्रक झाले गायब!

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | कर्जत तालुयात लाल मातीची तस्करी करणार्‍यांवर धडक कारवाई करत, तहसीलदारांनी चांगलाच दणका दिला आहे. बेकायदा उत्खनन करुन माती घेऊन जाणार्‍या गाड्यांवर लाखोंचा दंड लावण्यात आला आहे. त्यामुळे लाल मातीची तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
 
तर दुसरीकडे कारवाईदरम्यान सापडलेले ७ रिकामे ट्रक गायब झाल्याने महसूस विभागाचे टेंशन वाढले आहे. दरम्यान, या रिकाम्या वाहनांवर होणार की नाही? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तालुयातील नांदगाव, खांडस, ओलमण आणि पाथरज या चार ग्रामपंचायतींचे वैभव असलेली लाल माती रात्रीच्या अंधारात हायवा गाड्यांमध्ये भरून पनवेल नवी मुंबईत विकली जात आहे.
 
७ एप्रिलच्या रात्री आणि ८ एप्रिलच्या पहाटे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव आणि महसूल विभागातील कर्मचार्‍यांकडून याठिकाणी धाड टाकण्यात आली. त्यावेळी महसूल अधिकार्‍यांनी ३ ट्रक पोलीस ठाणे येथे आणून लावले. तर अन्य दोन ट्रकच्या टायरमधील हवा काढून त्या गाड्या जागच्या हलणार नाहीत याची काळजी घेतली. तर अन्य सात ट्रकमधील माती चिमटेवाडी येथे खाली करुन ते ट्रक जंगल भागात उभे करुन गाडीचालक जंगलात पळून गेले.
चिमटेवाडी येथील ट्रक हलवले
मध्यरात्री अडीच वाजता महसूल अधिकारी चिमटे वाडी येथे पोहचले तर त्याच भागातील मोहोपाडा ते बळीवरे गावांच्या हद्दीत एक हायवा ट्रक माती भरून जंगलात उभा करून ठेवून चालक पळून गेले होते. ट्रकचालकांनी पहाटे पाच वाजता चिमटेवाडी येथून आपल्या गाड्या काढून नेरळ मार्गे पनवेलकडे नेल्या.
 
या सर्व गाड्यांचे नंबर महसूल विभागाकडे असून त्याची व्हिडीओ शूटिंगदेखील महसूल विभागाकडे आहे. त्यामुळे त्या सर्व गाड्यांना अभय देण्यासाठी कर्जत तालुयातील राजकीय पुढारी तहसीलदार यांच्याकडे फिरकू लागले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनावर दबाव वाढला असून प्रशासन नक्की कोणती कारवाई करणार?
 
याकडे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी महसूल विभागाकडून लाल मातीने भरलेल्या सर्व गाड्यांच्या मालकांना नोटीस बजावली आहे. त्यात त्या गाडी मालकाकडून लाल मातीबाबत खुलासा मागण्यात आला आहे. खुलासा देण्यासाठी मुदत देण्यात आली असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत महसूल विभागात आहे. मात्र त्या प्रत्येक गाडीला साधारण दोन लाख ४० हजाराचा दंड बसण्याची शयता आहे.
तहसीलदार कठोर भूमिका घेणार काय?
या अनपेक्षित घटनेने कर्जत तालुयात पहाटेच्या चार वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. महसूल अधिकारी तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या ठाम भूमिकेमुळे कर्जत तालुयातून लाल माती नवी मुंबईत नेऊन रग्गड पैसा कमावणार्‍यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
 
ही कारवाई झाल्यावर सोशल मीडियावर महसूल खात्याचे कौतुक होत आहे. मात्र महसूल विभागचे अधिकारी यांनी नांदगाव ग्रामपंचायतीमधील चिमटेवाडी येथे लाल मातीची वाहतूक करणारे सात ट्रक कारवाईच्या भीतीने लाल माती अन्यत्र टाकून जंगलात लपवून ठेवण्यात आले होते.
 
त्या ट्रकचे नंबर आणि व्हिडीओ शूटिंग कर्जत महसूल अधिकार्‍यांकडे आहेत. त्यामुळे महसूल विभागाने मातीने भरलेल्या ट्रकबरोबर लाल मातीची वाहतूक करणार्‍या त्या सातही ट्रकवर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य लोकांकडून केली जात आहे. राजकीय दबावाला बळी न पडता तहसीलदार यांनी त्या गाड्यांमधील लाल मातीचे अवशेष हे पुरावे मानून त्या सर्व गाड्यांवर अन्य गाड्यांप्रमाणे कारवाई करावी आणि राजकीय पुढार्‍यांचे दबाव धुडकावून लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लाल माती घेऊन जाणार्‍या ट्रकवर लक्ष्य ठेवण्यासाठी कर्जत चारफाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि गस्तीसाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी महसूल विभागाकडून सरप्राईज व्हिजीट दिल्या जातील. -डॉ. धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत