महाड | महाडमध्ये मतदान केंद्राबाहेर आपापसात हाणामारी करणार्या, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे एकमेकांसमोर छाती ताणणार्या या दोन्ही गटांनी परस्परांवर हल्ला झाल्याची तक्रार केली आहे. महाड नगरपालिकेसाठी मंगळवारी, २ डिसेंबर रोजी मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरु असतानाच शहरातील रोहीदास नगर नगरपालिका शाळा क्र. ५ या मतदान केंद्राबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि त्यांचे युवा नेते एकमेकांसमोर भिडले. या घटनेमुळे शहरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या राड्यानंतर दोन्ही गटांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे.
हाणामारीबाबात दोघांकडून आपापली वेगवेगळी फिर्याद पोलिसांकडे सांगण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष सुशांत जाबरे (रा. टोळ, ता. महाड) यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीमध्ये, शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे (सर्व रा. ढालकाठी, ता. महाड) तसेच सिद्धेश शेठ (रा. पोलादपूर) यांच्यासह अन्य ८-१० अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे म्हटले आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना व अंगरक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करतानाच, अंगरक्षकाची बंदूक हिसकावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन गाड्यांच्या काचा फोडणे, तसेच एकाची सोन्याची चैन आणि चार मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. त्यानुसार महाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यानंतर दुसरी तक्रार शिवसेनेचे महेश निवृत्ती गोगावले (वय ३९, रा. पिंपळवाडी, महाड) यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार सुशांत जाबरे (रा. टोळ), हनुमंत मोतीराम जगताप, श्रीयश माणिक जगताप, धनंजय (बंटी) देशमुख, जगदीश पवार (सर्व रा. महाड), निलेश महाडीक (रा. किंजळोली, महाड) तसेच अमित शिगवण, व्यंकट मंडाला, गोपालसिंग, मंजीतसिंग अरोरा, मोनीश पाल, समीर रेवाळे आणि इतर ८-१० जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. गोगावले यांच्या तक्रारीनुसार, सुशांत जाबरे तसेच राष्ट्रवादीने जीवे मारण्याच्या उद्देशाने जमाव जमवला.
यापैकी गोपालसिंग यांनी बंदूक रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच इतरांनी काठी व हॉकी स्टीकने त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या दरम्यान विजय मालुसरे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. या दोन्ही तक्रारी एकाच घटनेच्या परस्परविरोधी तक्रारी असून संपूर्ण घटना महाड शहरात घडल्यामुळे तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.