आरपीआयचे कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर यांच्यावर हल्ला ; कर्जतमध्ये खळबळ, पोलीस ठाण्यात लेखी तक्रार

By Raigad Times    04-Dec-2025
Total Views |
 karjat
 
कर्जत | आरपीआय आठवले गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून याबाबची तक्रार डाळींबकर यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे केली आहे.
 
डाळींबकर यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी राहुल डाळींबकर त्यांच्या घरी बुध्दनगर येथे जात असताना नागदेव यांनी हातवारे करीत डिवचण्याचा प्रयत्न केला. याबाबत डाळिंबकर यांनी, नागदेव यांना का रे, काय झाले? असे विचारले त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी नागदेव याने डाळींबकर यांना जातीवाचक बोलत हल्ला केला.
 
तसेच लोखंडी कड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. डाळींबकर बचावचा प्रयत्न करत असताना पाठीमागे पॅन्टमध्ये खोचून ठेवलेला चॉपर काढून अंगावर धावून आला. यानंतर सचिन भालेराव आणि इतरांनी राकेश नागदेव यास पकडले पोलीस ठाणे येथे घेऊन गेले.
 
कर्जत पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, राकेश अशोक नागदेव यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीचे काम केले होते. त्यामुळे या भांडणाला राजकीय किनार असल्याची चर्चा आहे.