पनवेल महापालिकेसाठी महायुतीची घोषणा , भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय एकत्र लढणार

By Raigad Times    30-Dec-2025
Total Views |
 Panvel
 
पनवेल । पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने, त्याआधीच सोमवारी महायुतीची घोषणा करण्यात आली.
 
महायुतीत सर्वांधिक 71 जागा भाजपा लढवणार असून 4 शिवसेना शिंदे गट, 4 राष्ट्रवादी अजित पवार गट, 2 आरपीआय आठवले गट 1 याप्रमाणे जागा वाटप करण्यात आले आहे.सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण, आरपीआयचे प्रभाकर कांबळे, अनिल भगत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
 
याच पत्रकार परिषदेत आ.महेश बालदी यांनी अधिकृतपणे महायुतीची घोषणा केली. महायुतीची घोषणा होताच आता सर्वच पक्षांचे लक्ष 3 जानेवारी रोजी होणार्‍या चिन्ह वाटपाकडे आणि त्यानंतर सुरू होणार्‍या प्रचार रणधुमाळीकडे वळले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेलमध्ये भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की मित्रपक्षांसोबत जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राजकीय समतोल राखत मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
 
महायुतीची घोषणा करताना आमदार महेश बालदी यांनी, भाजप व महायुतीची धोरणे जनमाणसात लोकप्रिय असून, पनवेल शहरात झालेली विकासकामे आणि भाजपचे स्पष्ट धोरण पाहता या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जागावाटपात महायुतीअंतर्गत पनवेल महानगरपालिकेतील एकूण 78 जागांपैकी 71 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला 4, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 तर आरपीआयला 1 जागा देण्यात आली आहे.
 
दरम्यान, प्रभाग क्रमांक 12 मधील अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर आरपीआयकडून प्रभाकर कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असून, त्यामुळे भाजपआरपीआय युतीचा सामाजिक संदेश अधिक ठळकपणे मतदारांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुपारी तीन नंतर एबी फॉर्म देणार!
बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी (30 डिसेंबर) दुपारी तीन वाजता एबी फॉर्म देण्यात येणार आहे. तेव्हाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. हा आमच्या रणनीतीचा भाग असल्याचेही भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले.
3 जानेवारीनंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट!
3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतर सर्व उमेदवारांची अधिकृत नावे आणि पॅनल स्पष्ट होणार आहेत. त्यानंतर प्रचाराला वेग येईल. महायुतीकडून आता संघटनात्मक ताकद, विकासकामे आणि स्थिर प्रशासन हे मुद्दे पुढे केले जाणार असून, विरोधकांकडून यावर कशी रणनीती आखली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.