खोपोली । खोपोली येथे नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटातर्फे सोमवारी (29 डिसेंबर) सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. राजकीय वैमनस्यातून शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी सुमारे 7 वाजता मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती.
या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये आमदार महेंद्र थोरवे, मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींसह शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हा कँडल मार्च साईबाबानगर येथील काळोखे यांच्या निवासस्थानापासून खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला. यावेळी “मंगेश काळोखे अमर रहे” अशा घोषणा देत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
मार्चदरम्यान आमदार महेंद्र थोरवे आणि मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांना निवेदन सादर करून, या हत्येतील सूत्रधारासह उर्वरित मारेकर्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून, तपास पूर्ण करून हत्येच्या सूत्रधारालाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी नेहुल यांनी दिले.