महाड । महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीत सोमवारी (29 डिसेंबर) सायंकाळी वायुगळतीची घटना घडल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कंपनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेत कंपनीतील चार कामगारांना वायूची बाधा होऊन ते जखमी झाले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास प्लांटमधील क्लोरीन वाहून नेणारी पाइपलाईन लीक झाल्याने क्लोरीन वायू हवेत पसरला.
वायुगळती लक्षात येताच कंपनी प्रशासनाने तत्काळ प्लांट बंद करून सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच स्पॅनची टीम, अग्निशामक दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कंपनी प्रशासनाच्या सहकार्याने वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या वायूची बाधा झालेल्या चार कामगारांना कंपनीतील वैद्यकीय डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार दिले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक काशिद यांनी दिली आहे. वायुगळती नियंत्रणात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला असून, पुढील तपास व सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.