हत्येमध्ये देवकर कुटुंबाचे रंगले हात? पती, पत्नी, दोन मुले, मेहुण्यासह 9 जण गेले आत

रायगड पोलिसांची मोठी कारवाई । न्यायालयाकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

By Raigad Times    29-Dec-2025
Total Views |
khopoli
 
खोपोली । खोपोली शहरासह महाराष्ट्राला हादरवून टाकणार्‍या मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी 24 तासांत सूत्रधारासह 9 जणांना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 
काळोखे यांच्या हत्येनंतर या सर्वांनी मोबाईल फोन बंद ठेवत भूमिगत होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केले आहेत. मंगेश सदाशिव काळोखे ऊर्फ आप्पा (वय 45) हे शुक्रवारी (26 डिसेंबर) रोजी सकाळी पावणेसात वाजता मुलीला शिशुमंदिरस्कूल, खोपोली येथे सोडण्यासाठी गेले होते. शाळेतून परत येत असताना विहारी गावातील जया बारसमोरील चौकात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
 
दर्शन रविंद्र देवकर, सचिन संदिप चव्हाण व अन्य तीन इसमांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना खाली पाडले व तलवार, कोयता व कुर्‍हाडीने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक नेते राहिलेल्या मंगेश काळोखे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता. या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळाखे यांची हत्या केली.
 
या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. खोपोलीत नागरिक रस्त्यावर उतरले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मारेकर्‍यांना फाशीची मागणी केली आहे. काळोखे यांच्या हत्येनंतर रायगड जिल्ह्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. मारेकर्‍यांना शोधून काढण्याचे रायगड पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
 
पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची सात पोलीस पथके मारेकर्‍यांच्या मागे होती. त्यामुळे 24 तासांत सूत्रधार रविंद्र परशुराम देवकर, त्याची पत्नी उर्मिला रविंद्र देवकर, मुलगा दर्शन व धनेश रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार अशा 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हत्येनंतर मारेकर्‍यांनी मोबाईल फोन बंद करुन अंडरग्राऊंड होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
या प्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सध्या राजस्थानमध्ये गेल्याचे समजते. त्यांनादेखील अटक होण्याची शक्यता आहे. अटकेतील 9 जणांना रविवारी (28 डिसेंबर) खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रविंद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता.
 
या राजकीय वैरातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) प्रविण पडवळ, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, सहाय्यक पोलीस मनोज ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सपोनि भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे यांच्या पोलीस पथकांनी ही विशेष कामगिरी बजावली.