माणगावातील मोर्बा मार्गावरील गटारे तुंबली , नगरपंचायत-महामार्ग प्राधिकरणाच्या वादात पाच वर्षे रखडली नालेसफाई

By Raigad Times    29-Dec-2025
Total Views |
 MANGOV
 
माणगाव । माणगाव शहरातील मोरबा रोड परिसरातील नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान धोक्यात आणणारी गंभीर समस्या गेली पाच वर्षे प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मोर्बा रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधली असली, तरी नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यातील जबाबदारीच्या वादामुळे या गटारांची गेल्या पाच वर्षांत एकदाही नीट साफसफाई झालेली नाही.
 
परिणामी ही गटारे आज कचरा, गाळ व सांडपाण्याने तुडुंब भरली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दिघी-माणगाव-पुणे हा महत्त्वाचा महामार्ग मोरबा रोड मार्गे माणगाव शहरातून जातो. सन 2020 मध्ये हा महामार्ग पूर्ण झाला असला, तरी त्यासोबत बांधण्यात आलेली गटारे अनेक ठिकाणी आजही अर्धवट अवस्थेतआहेत.
 
काही ठिकाणी ही गटारे पूर्णपणे उघडी असून त्यांची खोली सुमारे पाच फूट आहे. अंधारात किंवा पावसाळ्यात या उघड्या गटारांमध्ये पडून अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गटारांची कामे अपूर्ण असल्याचे कारण देत माणगाव नगरपंचायतीने साफसफाईची जबाबदारी टाळली, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वारंवार सूचनाआणि तक्रारी करुनही या प्रश्नाकडे पाठ फिरवली.
 
या निष्काळजीपणाचा फटका थेट शेतकर्‍यांना बसला आहे. गटारांमधील तुंबलेले सांडपाणी थेट खांदाड परिसरातील शेतजमिनीत सोडण्यात आल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. भातशेती व कडधान्यांची पिके नापीक झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
 
पावसाळ्याच्या काळात या तुंबलेल्या गटारांमुळे परिस्थिती आणखी भयावह होते. खांदाड, मोर्बा रोड, सिद्धीनगर, एसटी बसस्थानक परिसर आणि बामणोली रोड या भागांत दरवर्षी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, फर्निचर आणि घरांची संरचना यांचे मोठे नुकसान होते. वर्षानुवर्षे होणार्‍या या त्रासामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
 
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कृती न झाल्याने नागरिकांचा विश्वास ढासळत चालला आहे. आता संयमाचा बांध सुटण्याच्या मार्गावर असून, मोर्बा रोडवरील गटारांची तातडीने साफसफाई, अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि प्रभावी पाणी निचरा व्यवस्था उभारणे यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर खांदाड, सिद्धीनगर आणि मोर्बा रोड परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, अशी भावना संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.