म्हसळा तालुक्यात थंडीचा कहर , अनेक वर्षातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

By Raigad Times    29-Dec-2025
Total Views |
 mhasala
 
म्हसळा । म्हसळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यंदाच्या हिवाळ्यात गेल्या अनेक वर्षांतील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांना तीव्र गारठ्याचा सामना करावा लागत आहे. पहाटेच्या वेळी तापमान मोठ्या प्रमाणात घसरल्याने संपूर्ण तालुका अक्षरशः थंडीच्या कवेत सापडला आहे.
 
विशेषतः ग्रामीण भागात सकाळी व रात्री प्रचंड गारठा जाणवत असून, धुके आणि बोचरी थंडी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहाटे लवकर शेतात जाणार्‍या शेतकरी, कामगार तसेच शाळकरी मुलांना थंडीचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी लोक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. थंडीचा परिणाम भाजीपाला, फळबागा तसेच रब्बी पिकांवर दिसून येण्याची शक्यता असून, काही शेतकर्‍यांनी पिकांवर दव पडत असल्याची माहिती दिली आहे.
 
अचानक वाढलेल्या थंडीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त केली जात आहे. वृद्ध नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. गरम कपडे वापरणे, थंड वार्‍यापासून बचाव करणे आणि आवश्यक तेवढीच बाहेर पडणे, असे सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस थंडीचा हा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून, तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.