आंबेनळी घाटात कार 100 फूट दरीत कोसळली , दहा वर्षांच्या मुलाने प्रसंगावधान राखत वाचवने 5 जणांचे प्राण

By Raigad Times    29-Dec-2025
Total Views |
 Poladpur
 
पोलादपूर । आंबेनळी घाटात वळणदार व तीव्र उताराच्या ठिकाणी टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील दहा वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले.
 
अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या दहा वर्षीय मुलाने धैर्य दाखवत तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन घटनेची माहिती दिली. मात्र फोनवर मुलाचा आवाज असल्याने सुरुवातीला सहलीच्या बसचा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
 
अपघाताचे नेमके ठिकाण स्पष्ट न समजल्याने शोधकार्याला काहीसा विलंब झाला. नंतर कारच्या टायरच्या खुणांच्या आधारे घटनास्थळ निश्चित झाल्यानंतर बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोल दरी, घनदाट जंगल व अत्यंत अवघड भौगोलिक परिस्थिती असतानाही दोरखंड, सुरक्षा साधने व अन्य उपकरणांच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले.
 
कारमधील एकूण पाच जणांपैकी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बचाव मोहिमेत अजित जाधव, आशिष बिरामणे, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ऋषिकेश जाधव, साई हवलदार, विक्रांत जाधव, सुनील बाबा भाटिया, सुजित कोळी, अमीत कोळी, अनिल केळगणे तसेच अन्य सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, आंबेनळी घाटात सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीमार्फत घाटरस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून, जुन्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मात्र महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआयडीसी) कडून ठेकेदाराच्या कामावर आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून केला जात आहे. रस्त्याची सुरक्षितता धोक्यात येत असून, अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.