उरण येथे मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्क उभारणार? 100 एकर जागेवर भराव? शेतकरी चिंताग्रस्त

By Raigad Times    27-Dec-2025
Total Views |
 uran
 
उरण । उरण तालुक्यात चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील 100 एकर जागेवर भराव टाकून एमआयडीसी आणि मेरिटाईम बोर्डाकडून मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्कची उभारणी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आधीच उधाणामुळे हजारो एकर शेती नापीकी झालेले असतना आता हा प्रकल्प येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातारण झाले आहे.
 
खोपटा, आवरे, पिरकोण,गोठवणे, चाणजे, वशेणी, पुनाडे, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनार्‍या वरील स्थानिक शेतकर्‍यांचे उपजीविकेचे साधन भात शेती आहे. परंतु गेली अनेक वर्षे खाडी किनार्‍यावरील बांधबंदीस्तीची कामे न केल्याने समुद्रातील खारे पाणी भात शेतीत शिरत आहे.
 
त्यातच जेएनपीए व करंजा बंदरात या अगोदर करण्यात आलेल्या दगड मातीच्या भरामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी हे सातत्याने भात शेतीत शिरत आहे. असे असताना, शासन पुन्हा एकदा चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील 100 एकर जागेवर भराव टाकून मल्टिमाँडेल लाँजिस्टीक पार्क उभारण्याच्या तयारीत असून एमआयडीसी आणि मेरिटाईम बोर्डाने त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
 
चाणजे, खोपटा, गोवठणे, वशेणी, पुनाडे, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भात शेतीत उधाणाचे पाणी शिरुन भातशेती नापीक होण्याचा संभव आहे. तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील अधिकार्‍यांनी पाहणी करून बांधबंदीस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी शेतकरी करत आहे.
उरण तालुक्यातील बांधबंदीस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु निधी उपलब्ध होऊ न शकल्याने सदरची कामे रेंगाळत पडली आहेत. - सत्यवान भगत, अध्यक्ष, उरण तालुका मनसे
उरण तालुक्यात खोपटा परिसरातील खाडीकिनार्‍या वरील बांधबंदीस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता खारभूमी, पेण