राजकीय वादातून मंगेश काळोखेंची हत्या! सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

खोपोली हादरली;महिलांचा आक्रोश,महामार्ग रोखला, पोलीस अलर्ट...

By Raigad Times    27-Dec-2025
Total Views |
khopoli
 
खोपोली । नगरपालिका निवडणुकीत केलेला पराभव आणि जुन्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी नगरसेवक मंगेश सदाशिव काळोखे (वय 45) यांची शुक्रवारी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कुर्‍हाड, कोयता व तलवारीने डोक्यावर सपासप वार करुन त्यांची जागीच हत्या करण्यात आल्याने खोपोली शहर हादरले आहे.
 
या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी, 26 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास, मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना जनता विद्यालयातील शिशु मंदिरमध्ये सोडून मोटारसायकलने साईबाबानगर येथील घरी परतत असताना विहारीगाव चौकाजवळ मारेकर्‍यांनी त्यांच्या दुचाकीला धडक देत रस्ता अडवला.
 
khopoli
 
काहीतरी अनर्थ घडणार याची चाहूल लागताच काळोखे यांनी जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र मारेकर्‍यांनी त्यांना जया बारसमोरील चौकात गाठत धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या केली आणि फरार झाले. घटनेची माहिती खोपोलीत वार्‍यासारखी पसरताच मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व महिलांनी घटनास्थळी तसेच खोपोली पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. साईबाबानगर परिसरातील महिलांनी “आमचा देव गेला” असा आक्रोश करत मारेकर्‍यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
 
यावेळी महिलांनी दोन वेळा महामार्ग रोखून आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केले. शिंदे गटाचे मंगेश काळोखे आणि राष्ट्रवादीचे रविंद्र देवकर यांनी खोपोली नगरपालिका निवडणुकीत दोन वेळा परस्परविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा मंगेश काळोखे यांनी देवकर यांचा पराभव केला होता. या वादातूनच हत्या करण्यात आल्याचे पोलीस एफआयआरमध्ये म्हटले आहे.
 
khopoli
 
हत्या केल्यानंतर खुनी फरार झाले होते. याप्रकरणी मृत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील रविंद्र परशुराम देवकर, 2) दर्शन रविंद्र देवकर, 3) धनेश रविंद्र देवकर, 4) सचिन संदिप चव्हाण, 1 ते 4 रा. साईबाबानगर, रहाटवडे, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, 5) सुधाकर परशुराम घारे, रा.सांगवी, ता.कर्जत, 6) भरत भगत, रा.अवसरे, ता. कर्जत 7) रविंद्र देवकर याचा बाऊंसर व इतर अनोळखी 3 इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, तसेच गुप्तहेर विभागाचे जिल्हा निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
 
khopoli
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून मानसी मंगेश काळोखे या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. निकालानंतर दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू होती. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील स्टेटसच्या माध्यमातून एकमेकांना दिलेल्या आव्हानांमुळे वाद अधिकच विकोपाला गेला आणि त्यातूनच हा खून झाल्याची चर्चा आहे. खोपोली शहरात अद्यापही तणावपूर्ण शांतता असून मारेकर्‍यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे.