मुरुड-जंजिरा । नाताळ नाताळ व वर्षाअखेरीच्या सुट्यांच्या पोर्शभूमीवर मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव तसेच ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. मुरुडसह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदी पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. राजपुरीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. सायंकाळी ओहोटीमुळे समुद्राचे पाणी कमी झाल्याने जेटीला बोटी न लागल्याने अनेक पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावे लागले, तर दुसर्या दिवशी सकाळी एकाच वेळी गर्दी झाल्याने जेटी परिसरात ताण निर्माण झाला. शाळांच्या सहलींचाही मोठा ओघ असून दररोज अनेक बसेस जंजिरा किल्ल्याकडे येत आहेत.
समुद्रकिनार्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत असून ते नाताळ सुटीचा मनसोक्त आनंद घेत आहेत. बहुतांश लॉज व हॉटेल्स पूर्ण क्षमतेने भरले असून समुद्रकिनार्यावरील स्टॉल्सवरही गर्दी पाहावयास मिळत आहे. लहान मुले वाळूत किल्ले बांधत आनंद लुटताना दिसत आहेत औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, लातूर, परभणी तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार आदी भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक मुरुडमध्ये दाखल झाले आहेत.
रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी योग्य नियोजन करत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चोख भूमिका बजावली पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक हॉटेल, दुकाने व व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळत असून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
समुद्रस्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंग आदी उपक्रमांना मोठी पसंती मिळत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जेटी नसल्याने पर्यटकांना तेथे उतरता येत नाही, याबाबत नाराजी व्यक्त होत असून किल्ल्याचे संवर्धन व फ्लोटिंग जेटी उभारण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.