पनवेल । नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका नामांकित शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्यावर शिक्षकांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिला शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 आणि 28 नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या दिवशी व दोन वेगवेगळ्या शिक्षिकांकडून मुलाला मारहाण करण्यात आली. शाळकरी मुलांमधील आपापसातील भांडणावरून या प्रकाराला सुरुवात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत संशयित वर्गशिक्षिकेने दुसर्या वर्गातील एका विद्यार्थिनीला बोलावून पिडीत मुलाच्या गालावर पाच ते सहा वेळा मारण्यास सांगितले. ही घटना घडत असताना संबंधित शिक्षिका हसत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यानंतर इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेने पिडीत विद्यार्थ्याच्या तोंडावर कंपास बॉक्सने मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा ओठ सुजल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.