अलिबाग । राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक व भावी उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काही उमेदवारांनी थेट मतदारसंघातील "लाडक्या बहिणी" आणि नागरिकांसाठी देवदर्शन तसेच पर्यटन सहलींचा मार्ग अवलंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मतदारसंघातील मतदारांना विविध प्रमुख देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घडवण्याचे आयोजन केले जात आहे. यामध्ये धार्मिक भावनांना हात घालून मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. तर काही उमेदवारांनी थेट गोवा, अलिबाग, मुरुड यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या सहली आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्याची युक्ती अवलंबली आहे.
विशेषतः अलिबागसारख्या पर्यटनस्थळी नेऊन मतदारसंघातील महिलांसाठी सहली आयोजित केल्या जात असून, त्यातून आपली प्रभाग क्र. २७ मधील लाडक्या बहिणीसाठी दोन दिवसीय विनामुल्य सहल अलिबाग कोकण प्रतिमा "लोकाभिमुख" दाखविण्याचा प्रयत्न काही भावी उमेदवार करत असल्याचे चित्र आहे. या सहलींना सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वरूप देण्यात येत असले, तरी निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या उपक्रमांत वाढ होत असल्याने, हे प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन ठरतात का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. काही मतदारांकडून या सहलींकडे मनोरंजन म्हणून पाहिले जात असले, तरी सुज्ञ मतदारांनी अशा आमिषांना बळी न पडता विकास, कामगिरी व प्रामाणिक नेतृत्वाच्या आधारे मतदान करावे, असे मतही व्यक्त केले जात आहे.दरम्यान, निवडणूक आयोग आणि प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, महापालिका निवडणुकांत पर्यटन व देवदर्शनाच्या नावाखाली होणाऱ्या या "नव्या प्रचारपद्धती वर नियंत्रण आणले जाणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.