रायगड किनार्‍यावर पर्यटकांची तुफान गर्दी , नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लाखो पर्यटक दाखल

By Raigad Times    26-Dec-2025
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । नाताळ सण आणि नववर्ष 2025 च्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अलिबाग, काशिद, मुरुड, नांदगाव, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, मांडवा आदी समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी उसळल्याने पर्यटनस्थळांवर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नाताळचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून पर्यटक रायगडमध्ये दाखल होत आहेत. कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींच्या गटाने पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने समुद्रकिनार्‍यांवर, रिसॉर्ट्स, होमस्टे, हॉटेल्स व लॉजिंग हाऊसमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवर गजबजाटाचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
Alibag
 
रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुका हे पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखले जातात. नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने काशिद, मुरुड, नांदगाव व अलिबाग किनार्‍यावर पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येत आहे. पर्यटक समुद्रस्नान, सूर्यास्ताचा आनंद, बोटिंग तसेच समुद्री साहसी खेळांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.
 
इथे आल्यानंतर फिरण्याच्या ठिकाणांपासून ते खाण्यापर्यंत सर्व नियोजन पर्यटकांनी आधीच केले असल्याने स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, पर्यटन मार्गदर्शक तसेच हातगाडी व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होत आहे. एकूणच रायगडमधील पर्यटन व्यवसायाला यामुळे चांगलीच चालना मिळाली आहे. दरम्यान, वाढत्या पर्यटकसंख्येमुळे पोलिस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली असून, समुद्रकिनार्‍यांवर देखरेख वाढवण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या काळात रायगड किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.