श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीला शिवसेना ठाकरे गटाचा हादरा , नगराध्यक्षपदी ठाकरे गटाचे अ‍ॅड.अतुल चौगुले विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 15, शिवसेना शिंदे गटाचे 3, भाजपचे 2 उमेदवार विजयी

By Raigad Times    23-Dec-2025
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन । राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि मंत्री अदिती तटकरे यांचा होमग्राऊंड समजल्या जाणार्‍या श्रीवर्धन नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाचे अ‍ॅड.अतुल चौगुले विजयी झाले आहेत. त्यांनी अक्षरशः ‘एकटा टायगर’सारखी निवडणूक लढवली. त्यांनी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांचा 219 मतांनी पराभव केला.
 
या नगरपालिकेत राष्ट्रवादीचे 15, शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांची युती असल्याने अनेक वर्षांनंतर भाजपाचे दोन नगरसेवक श्रीवर्धन नगरपरिषदेत निवडून आले आहेत.
 
shreewardhan
 
सुप्रिया चौगुले आणि प्रणिल बोरकर यांनी भाजपाचे नगरसेवक होण्याचा मान मिळवला आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून देवेंद्र भुसाणे, सलोनी मोहित-भगत आणि माजी शहरप्रमुख संतोष उर्फ पिंट्या वेशवीकर यांनी विजय संपादन केला आहे. थेट नगराध्यक्षपदी अ‍ॅड.अतुल चौगुले विजयी झाल्यानंतर राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी श्रीवर्धन येथे भेट देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.
 
त्यानंतर काही प्रसारमाध्यमांतून अ‍ॅड. अतुल चौगुले हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र अशा कोणत्याही प्रवेशाबाबत शिवसेना (ठाकरे गट) कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 2009 पासून श्रीवर्धन नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची अर्थात तटकरेंची सत्ता होती. या निवडणुकीत श्रीवर्धनकरांनी 21 पैकी 15 जागा राष्ट्रवादीला दिल्या.
 
3 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. भाजपनेही दोन जागा जिंकल्या. मात्र नगराध्यक्षपदासारखे महत्वाचे पद शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या हातात सोपवले आहे. श्रीवर्धन हातून जाणे म्हणजे रायगडचे खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री अदिती तटकरे प्रचारासाठी श्रीवर्धनात तळ ठोकून बसल्या होत्या तर खासदार तटकरे यांचेदेखील श्रीवर्धनकडे लक्ष होते.
 
shreewardhan
 
असे असतानाही श्रीवर्धनकरांनी अ‍ॅड.अतुल चौगुले यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले असले तरी काही प्रभागांत क्रॉस व्होटींग झाल्यामुळे अ‍ॅड. अतुल चौगुले यांच्या पारड्यात विजय पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकूणच श्रीवर्धन नगरपरिषदेचा हा निकाल नाट्यमय ठरला असून, पुढील काळात सत्तास्थापना, पक्षांतर आणि नगरपरिषदेच्या कारभाराची दिशा काय असेल? याबाबत श्रीवर्धनच्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रतिक्रिया देताना विजयी उमेदवार अ‍ॅड. अतुल चौगुले यांनी जनता, मतदार आणि कार्यकर्ते, पाठींबा देणारे ज्ञात-अज्ञात तसेच पाठींबा देणार्‍या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत.
विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
1) आनंद गुरव राष्ट्रवादी, 2) शमा वैद्य राष्ट्रवादी, 3) हरिदास वाघे राष्ट्रवादी, 4) प्रगती वाघे राष्ट्रवादी, 5) सलोनी मोहित-भगत शिवसेना शिंदे गट 6) देवेंद्र भुसाने शिवसेना-शिंदे गट 7) सुप्रिया चौगुले-भाजप, 8) संतोष विश्वकर शिवसेना शिंदे गट, 9) साक्षी पाबरेकर-राष्ट्रवादी, 10) प्रनिल बोरकर-भाजप, 11) राजश्री मुरकर राष्ट्रवादी, 12) प्रसाद विचारे राष्ट्रवादी, 13) शिवानी चौगुले राष्ट्रवादी, 14) इफ्तिखार राजपूरकर राष्ट्रवादी, 15) शबीस्ता सारखोत राष्ट्रवादी, 16) समीर साठविलकर राष्ट्रवादी, 17) बाळकृष्ण गोरनाक राष्ट्रवादी, 18) प्रविता माने राष्ट्रवादी, 19) गुलाब मांडवकर राष्ट्रवादी, 20) भावेश मांजरेकर राष्ट्रवादी
अ‍ॅड.अतुल चौगुले शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?
श्रीवर्धन नगराध्यक्षपदाची निवडणूक अ‍ॅड. अतुल चौगुले यांनी फक्त जनतेच्या विश्वासाच्या बळावर जिंकली आहे. चौगले श्रीवर्धनमध्ये एकाकी लढत असताना ठाकरेगटाच्या कोणताही मोठा चेहरा तिकडे फिरकला नाही. महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याकडून हातभार लाभल्याचे बोलले जाते. त्यामुळे विजयी झाल्यानंतर ते अ‍ॅड. अतुल चौगुले यांचे अभिनंदन करण्यासाठी श्रीवर्धनला पोहचले. त्याच क्षणापासून चौगुले हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशाही चर्चा सुरु झाली आहे.