लाडकी बहीण योजनेचे तब्बल १६५ कोटी लाटले ! अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

By Raigad Times    13-Dec-2025
Total Views |
nagpur
 
नागपूर | लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत राज्यातील ९८ हजार ९५७ अपात्र नागरिकांनी सरकारची तब्बल १६५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी, तसेच ९ हजार ५२६ शासकीय महिला कर्मचार्‍यांनी १४.५० कोटी रुपये लाटले आहेत. १२ ते १४ हजार महिलांनी त्यांच्या नावे बँक खाते नसल्याने पती किंवा नातेवाईकांच्या खात्याचा वापर करुन आर्थिक सहाय्य मिळवले. या योजनेच्या सुरुवातीला विभागाकडे इतर योजनांच्या लाभार्थ्यांचा सर्वसमावेशक डेटा नव्हता.
 
मात्र आता आयटी विभागाच्या मदतीने डेटा एकत्र केला जात आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. यावेळी अदिती तटकरे यांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून पैशांची वसुली करून त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाणार असल्याचेही जाहीर केले आहे.