पनवेल | खारघर शहरातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेद्वारे चालणारी इलेट्रिक बस सेवा गेल्या काही दिवसांपासून अपुर्या चार्जिंग सुविधांमुळे वारंवार ठप्प होत असून नागरिकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस वेळेवर चार्ज न झाल्याने निर्धारित वेळापत्रकानुसार फेर्या राबवल्या जात नसल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे.
या पोर्शभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने खारघरमध्ये स्वतंत्र आधुनिक चार्जिंग स्टेशन तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.बससेवा विस्कळीत झाल्यामुळे शाळा- कॉलेज विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचत असून नोकरीला जाणार्यांना पर्यायी प्रवास साधनांचा वापर करावा लागत आहे.
वयोवृद्ध नागरिकांना बस थांब्यावर दीर्घकाळ वाट पाहावी लागत असल्याने नाराजी वाढत आहे. वेगाने विकसित होत असलेल्या खारघर शहरात सार्वजनिक वाहतूक ही मूलभूत गरज असताना पुरेशा चार्जिंग क्षमतेचा अभाव ही गंभीर प्रशासनिक त्रुटी असल्याचे नागरिकांचे मत आहे. अनेक इलेट्रिक बस पहिल्या फेरीनंतर चार्जिंगसाठी डेपोमध्येच थांबतात, त्यामुळे दिवसभर सेवा विस्कळीत राहते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
ही समस्या लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघर उपशहरप्रमुख नंदु वारुंगसे यांनी परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांना लेखी निवेदन सादर केले. वारुंगसे म्हणाले, खारघरमधील नागरिकांना बस सेवेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चार्जिंग सुविधांचा अभाव हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे प्रतीक आहे. तात्काळ चार्जिंग स्टेशन उभारल्यास बस सेवा नियमित होऊन नागरिकांना दिलासा मिळेल.
निवेदनानंतर एनएमएमटी प्रशासनाकडे ही मागणी पोहोचली असून चार्जिंग स्टेशन उभारणीसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. वाढत्या प्रवासी संख्येला अनुसरून इलेट्रिक बस सेवा सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याची भावना सामाजिक संघटना, नागरिक व विद्यार्थी यांनी व्यक्त केली आहे.