नागावनंतर आक्षीत बिबट्याचा दोघांवर हल्ला , अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम

By Raigad Times    13-Dec-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. नागाव येथे सहा जणांना जखमी केल्यानंतर फसार झालेल्या बिबट्याने शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी आक्षी येथील साखर परिसरात दोन जणांवर हल्ला चढवला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
आनंद कुमार निषाद आणि मुव्वाला लोकनाथ अशी जखमी तरुणांची नावे आहेत. साखर कोळीवाडा परिसरात राहणारे आनंदकुमार आपल्या हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजता चहा बनवत होते. यावेळी बिबट्या त्यांच्या खोलीत शिरला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांना डोक्याला आणि हाताला जखमा झाल्या.
 
तर लोकनाथ हे प्रातःविधीसाठी बाहेर पडले होते यावेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली या दोन घटनांमुळे आक्षी परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी याबाबतची माहिती व वन विभागाला दिल्यानंतर वनकर्मचारी आणि अधिकारी तिथे दाखल झाले आहेत. दरम्यान, चार दिवसांत बिबट्याने आठ जणांना हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे दहशतखोर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

alibag
 
बिबट्याचा शोध सुरू
दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या दिसेनासा झाला आहे. तो आक्षीसाखर खाडी परिसरातील कांदळवनात लपला असावा, असा संशय आहे. त्यादृष्टीने तपास यंत्रणा कामाला लागली आहे. झाडाझुडपात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. रोहा तालुक्यातील कोलाड येथील बचाव पथक आणि पोलिसांची कुमक वन विभागाच्या मदतीला आहे. ड्रोन कॅमेर्‍यांच्या माध्यमातूनदेखील बिबट्याचा शोध सुरू आहे. परंतु संध्याकाळपर्यंत बिबट्या दृष्टीस पडला नाही.
सावधगिरीच्या सूचना
बिबट्याच्या शोध मोहिमेदरम्यान सावधगिरी बाळगली जात आहे.ज्या परीसरात बिबट्या आढळला आहे तेथून बघ्यांची गर्दी हटविण्यात आली आहे. पोलीस, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बचाव पथक आणि मोजकेच ग्रामस्थ यांनाच परिसरात प्रवेश दिला जात आहे. नागाव, आक्षी परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वन विभाग आणि पोलिसांनी केले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. कुणीही घाबरून जाऊ नये मात्र सावधानता बाळगावी, शक्यतो घराबाहेर पडू नये. लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवू नये. - नरेंद्र पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी
बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर केला जात आहे. याशिवाय ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात जर बिबट्या दिसला तर त्याला जेरबंद करणे सोपे जाईल. या भागात कुत्र्यांचा वावर अधिक आहे. त्यामुळे त्यांना खाण्यासाठी तो आला असावा. त्याला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. - सागर दहिंबेकर, कोलाड बचाव पथक