नागपूर | अंबादास दानवे यांनी व्हिडिओ मॉर्फ करून माझी बदनामी केली आहे, त्यांच्या या हरकतीमुळे दानवे यांना कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. दळवी यांनी सांगितले की, दानवेंनी जाणीवपूर्वक खोटा आणि छेडछाड केलेला व्हिडिओ शेअर केला.
यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असून, उद्देशपूर्वक बदनामीचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दानवेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र हा प्रकार मॉर्फिंगचा असल्याचे दळवींचे म्हणणे आहे. त्यांनी बनावट व्हिडिओ प्रसारित करून दिशाभूल केल्याबद्दल दानवेंकडून सार्वजनिक माफीचीही मागणी केली आहे.
अलिबाग | शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना दिले आहे. अंबादास दानवे यांनी पैशांचे पुडके असलेल्या व्हिडिओसोबत आ. महेंद्र दळवी यांचे छायाचित्र जोडून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
यासाठी त्यांनी पैशाच्या बंडलासमोर दिसणार्या व्यक्तीचा चेहरा जाणीवपूर्वक दाखवला नाही, असे राजा केणी यांनी म्हटले आहे. व्हिडिओ क्लिप ही आमदार दळवी यांची नसून त्या क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती वेगळी आहे. या व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासून, चुकीची माहिती प्रसारित करून आमदारांची बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राजा केणी यांनी केली आहे. यावेळी कामगार नेते दीपक रानवडे, संतोष निगडे, मानसी दळवी, संजीवनी नाईक, मनोहर पाटील उपस्थित होते.