अलिबाग | रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. अवघ्या दोन दिवसांनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार असला तरी पक्षांतर्गत असंतोष, स्थानिक स्तरावरील मतभेद आणि बदललेले आरक्षण यामुळे निवडणूक स्वबळावर लढवायची की युती-आघाडीच्या स्वरुपात ? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. परंतु जिल्ह्यात ही महायुती प्रत्यक्षात कार्यरत नसून केवळ "कागदी युती” राहिल्याचे चित्र आहे. अनेक नगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजपचेच कार्यकर्ते एकमेकांविरोधात तीव्र भूमिकेत आहेत. कर्जतमध्ये तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर ठाकरे गटासोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातही अजून कोणत्याही हालचाली दिसत नाही. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाआघाडी एकसंध राहील की शेवटच्या क्षणी फुटेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षणामुळे अनेक नगरपालिकांत नवीन राजकीय गणिते तयार झाली आहेत. अनेक विद्यमान नगरसेवकांना त्यांच्या पारंपरिक प्रभागातून हलावे लागणार असल्याने स्थानिक पातळीवर नाराजीची लाट दिसत आहे. काही नेत्यांनी अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केले असले तरी अंतिम यादी जाहीर करण्यास पक्ष नेतृत्व टाळाटाळ करत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून काहीजण स्वबळावर किंवा अपक्ष म्हणून उभे राहण्याचा विचार करत आहेत.
आरक्षण बदलामुळे काही नगरपालिकांमध्ये नवीन चेहर्यांना संधी मिळणार आहे. तर काही ठिकाणी जुन्याच नेत्यांवर पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही, या द्विधा परिस्थितीत पक्ष अडकले आहेत. काही नगरपालिकांमध्ये तर एकाच पक्षातील दोन गट आपापल्या उमेदवारांचा दबाव नेतृत्वावर आणत आहेत. ही परिस्थिती पुढील दोन दिवसांत अधिक चिघळण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना, अजूनही जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट नाही. पक्षांतील बंडखोरी, स्वतंत्र उमेदवारी आणि स्थानिक राजकीय समीकरण याचसोबत महायुती आणि महाआघाडीमध्येही सर्व आलबेल आहे. त्यामुळे या निवडणुकीत लढती होणार कशा? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.