नवी मुंबई | नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणारी मोठी टोळी उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी देशभरातील विविध बँकांच्या ८८६ खात्यांचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या टोळीविरुद्ध भारतातील एनसीसीआरपी पोर्टलवर तब्बल ३९३ तक्रारी नोंद झाल्या असून ८३ कोटी ९७ लाख ४८ हजार २७८ रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. अटकेतील १२ जणांची नावे इसाण उस्मानी मिनहाज शेख, हितेश पुनाराम देवांगन, सुनील श्रवण देवांगन, तोमेशकुमार मोहित उईके, राहुल राजू देवांगण, अंकित रमेश सिंग, अभिषेक संजय सिंग, हरीशकुमार मदनलाल, अर्पित संतेन्द्रकुमार सोनवाणी, रजत दिलीप शर्मा, लालबाबू राजेश्वर रामकुमार आणि कृष्णाअंशू अमित विश्वास अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राहुल पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ऑनलाईन गेमिंग फसवणुकीत वापरण्यासाठी बँक खाती पुरवणारा इम्रान उस्मानी मिनहाज शेख (२२, रा. नेरुळ) सीबीडी रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ऑनलाईन फसवणूक केल्याचे कबूल केले. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
इम्रान शेख हा शासनमान्य ऑनलाईन गेमिंगसाठी खाते उघडून दिल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवत नवी मुंबईतील नागरिकांकडून बँक खाते, पासबुक, एटीएम कार्ड, लिंक मोबाइल सिम, धनादेश पुस्तिका यांचे किट घेत असे. ही किट्स तो डोंबिवली येथे पाठवित असल्याचे तपासात उघड झाले. डोंबिवली येथील ठिकाणी छापा टाकला असता प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग व सायबर फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याचे आढळले. पथकाने पंचनामा करून ५ जणांना अटक केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरी मोठी कारवाई
६ आरोपी जाळ्या अटक आरोपींच्या तांत्रिक तपासातून या टोळीचे इतर सदस्य पुणावळे, पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याचे समोर आले. त्या ठिकाणीही छापा टाकून ६ जणांना अटक करण्यात आली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक, शेअर मार्केटिंग फ्रॉड, जॉब रॅकेटिंग, वर्क-फ्रॉम-होम फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाईत सहभागी पथक
या कारवाईचे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे हे करीत आहेत. पथकात श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, सतिश भोसले, महेश जाधव, राहुल भदाने, मंगेश वाट, अनिल यादव, नितीन जगताप, महेश पाटील, संजय राणे, सतिश चव्हाण, निलेश किंद्रे, सचिन टिके, अजय कदम, दिलीप ठाकूर, सोमनाथ काळे, राहुल वाघ, नवनाथ पाटील, ओंकार भालेराव आणि पूजा वैद्य यांचा समावेश होता.
जप्त केलेले साहित्य
* ५२ मोबाईल फोन
* ७ लॅपटॉप
* ९९ विविध बँकांचे डेबिट कार्ड
* ६४ बँकांच्या धनादेश पुस्तिका
* १ टाटा सफारी कार एकूण किंमत १८ लाख ५ हजार