म्हसळा | म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथील वृध्द दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. म्हसळा पोलिसांनी या खूनाचा उलगडा पोलिसांना केला असून दोघांना अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मेंदडी कोंड गावातील महादेव कांबळे (वय ९५) आणि विठाबाई कांबळे (वय ८३) यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले. याप्रकरणी मृत दांपत्याची मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने म्हसळा पोलीसा तक्रार केली होती. म्हसळा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू असल्याची नोंद केली होती.
मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे आणि उपनिरीक्षक सुनिल कोहीणकर यांनी मोठ्या चातुर्याने घटनेमागील सत्य बाहेर आणले. याप्रकरणी नरेश महादेव कांबळे (वय ६२) चंद्रकांत महादेव कांबळे (वय ६०, निवृत्त कर्मचारी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हसळा पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला. दरम्यान, मेंदडी कोंड गाव हे सुमारे २०० ते २५० उंबरठ्यांचे सुसंस्कृत गाव असून, गावात श्री गणेश मंदिर, प्रशस्त दत्तमंदिर, दोन समाजमंदिरे आणि महिलांसाठी स्वतंत्र सभागृह अशा सर्व सोयी-सुविधा आहेत. अशा ऐक्यपूर्ण आणि सुसंस्कृत गावात घडलेली ही हृदयद्रावक घटना ग्रामस्थांसाठी धक्कादायक आणि अविश्वसनीय ठरली आहे.