अलिबाग । जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला होता. कोणाला नगराध्यक्ष व्हायचे आहे, तर कोणाला नगरसेवक, सर्वांनाच उमेदवारी लढवायची असते आणि जिंकायचेही असते.
असे असले तरी मंगळवारी झालेल्या छाननीत अनेकांची हिट विकेट गेली आहे. कागदपत्रातील अपूर्तता किंवा त्रुटी राहिल्याने या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. खोपोलीत मात्र प्रत्यक्ष लढाईत उतरण्यापूर्वीच राष्ट्रवादीकृत महापरिवर्तन आघाडी आणि शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे येथे घमासान सुरु होते.
अलिबाग नगरपालिकेतील 8 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ठरले अवैध...
अलिबाग । अलिबाग नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी नगराध्यक्षपदाचा एक तर नगरसेवक पदासाठीचे सात उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. मात्र अर्ज बाद झालेल्यांमध्ये प्रमुख उमेदवारांचा समावेश नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अलिबाग नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारी (17 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 74 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी झाली. या छाननीमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचा एक तर नगरसेवक पदासाठीचे सात अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांनी दिली. येत्या 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल.