कर्जत । साधी कच्ची घरे, मजुरी आणि शेतीवर चालणारं आयुष्य...नयन वाघ हा तरुणदेखील हेच आयुष्य जगत होता....दहावीत तो सलग तीन वेळा नापास झाला...अपघातामुळे पोलीस भरतीत उतरण्याची संधी हुकली होती.
इतरांप्रमाणे नयन मजुरीला जाऊ लागला...मजुरी करता करता तो एका शिक्षकाच्या संपर्कात आला आणि त्याचे आयुष्य पालटून गेले... गुरुच्या कानमंत्रानंतर नयन पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आला. अपार मेहनत आणि जिद्दीची पराकाष्ठा करत एमपीएससीसारख्या परिक्षेत तो आदिवासी विभागातून राज्यात पंधरावा आला. रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या ऐनाचीवाडी या आदिवासीवाडीतील हा तरुण सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला आहे.
कर्जत तालुक्याच्या एका टोकाला ऐनाची वाडी ही जेमतेम लोकवस्ती असलेली वाडी आहे. साधारण 150 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या वाडीत विठ्ठल वाघ आणि त्यांचे कुटुंब राहत. विठ्ठल वाघ यांचे शिक्षण चौथीपर्यंत झालेले. त्यामुळे आपल्या मुलाने शिकावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांचा मोठा मुलगा नयन दहावी इयत्तेमध्ये नापास झाला. वडिलांच्या इच्छेखातर त्याने आणखी दोन वेळा परीक्षा दिली.
मात्र त्यातही त्याला यश न आल्याने वडिलांनीदेखील मुलगा शिकेल ही आशा सोडून दिली. यानंतर शाळा सोडून नयन इतरांप्रमाणेच मजुरी करण्यासाठी जाऊ लागला. एके दिवशी गावातील शिक्षक पुंडलिक कंटे यांच्याकडे नयन मजुरीवर कामासाठी गेला होता. मेहनतीचे काम इमानेएतबार करत असलेल्या नयनला यावेळी शिक्षक पुंडलिक कंटे यांनी त्याच्या शिक्षणाबद्दल विचारणा केली.
यावेळी नयनने तो दहावीमध्ये तीनवेळा नापास झाल्याचे सांगितले. नयनला शिक्षणात.. फारसा रस नसल्याचे सरांच्या लक्षात आले मात्र ते थांबले त्यांनीत, त्यांनी नयनकडे पुन्हा शिकण्याचा आग्रह धरला. त्याला शिक्षणच महत्व पटवून देत त्याच्यातील शिक्षणाचा गमावलेला आत्मविश्वास वाढवून देण्याचं काम केले. त्यामुळे नयन पुन्हा एकदा शिक्षण पूर्ण करण्यासाठी तयार झाला. त्याने पुन्हा एकदा दहावी पास होण्यासाठी अभ्यास सुरु केला. यावेळी नयनने दहावीत गेलेले विषय सोडवत तो उत्तीर्ण झाला. यानंतरही त्याने शिक्षणाची कास काही सोडली नाही.
बारावीमध्ये महाविद्यालयात त्याने प्रथम क्रमांक मिळवला. कर्जत कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश मिळवत त्याने भूगोल या विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर सलग तीन वर्षे त्याने पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले; मात्र अनेकदा थोडक्यासाठी संधी हुकली. असे असले तरी नयन याने जिद्द सोडली नाही. 2019 मध्ये नयनने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. हे सगळ करत असताना मजुरीचे कामदेखील सुरु ठेवले. याचदरम्यान कोरोनामुळे परीक्षा रद्द झालेल्या होत्या.
कसाबसा दहावी काढणारा मुलगा अधिकारी होईल याची आशा कोणालाही नव्हती. घरच्यांनी पूनम नावाच्या मुलीसोबत नयनचे लग्न लावून दिले. लग्नानंतरही नयनने आपले स्वप्न सोडले नाही. यातच नयन याच्या वडीलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे घराची जबाबदारीदेखील होतीच, याही परिस्थितीत त्याने पालघर येथील जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकसेवा परीक्षेचे शिक्षण सुरू केले. त्यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक परीक्षा देताना शारीरिक चाचणीत त्याच्या पायाला इजा झाली होऊन ती संधी हुकली.
या अपघाताने नयनवर संकट आणखी गडद झाले. मात्र वॉकर घेऊन त्याने अभ्यास सुरू ठेवला. 2024 मध्ये काठी घेऊनच त्याने लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली. तसेच आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था याची स्कॉलरशिपची परीक्षादेखील दिली. यात त्याला यश आल्याने स्कॉलरशिप मिळाली. ही स्कॉलरशिप मैलाचा दगड ठरली आणि लोकसेवा आयोगाची परीक्षेचा अभ्यास करण आणखी सोप्प झाल्याचे नयन सांगतो. याच माध्यमातून पुणे येथे जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने खाटेवर शिक्षक यांनी त्याला मदत केली.
नयनवर घेतलेल्या मेहनतीमुळे नयन महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात आदिवासी विभागात 15 वा आला आहे. नयनने मिळवलेले हे यश खरोखर कौतुकास्पद आहे. नयन याने आपली जिद्द सोडली नाही, अनेक संकटांवर मात करून त्याने आपले स्वप्न पूर्ण व वडिलांची इच्छादेखील पूर्ण केली आहे. नयनाचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
बायकोने शिवणकाम करत केली मदत
लग्न झाल्यावर सहाच महिन्यात नयनने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केल्याने पत्नी पूनम वाघ हिला माहेरी पाठवून दिली. जेणेकरुन तिची परवड व्हायला नको. पूनम ही पदवीपर्यंत शिकलेली असल्याने तिने नवर्याची साथ दिली. माहेरी राहून पूनमला अनेक संकटांचा सामना करावा लागला.
अनेक दिवस माहेरी असल्याने नवर्याने सोडली, असे टोमणे ऐकावे लागले. तरी पूनमचा नवर्यावर विश्वास होता. त्यामुळे तीदेखील नवर्याच्या मागे खंबीर उभी राहिली. तेव्हा कपडे शिलाई करून मिळणार्या पैशातून तिने पती नयनला हातभार लावला.
भावाने सांभाळले घर
नयनचा लहान भाऊ राजेश विठ्ठल वाघ याने नयन घरात नसताना त्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत भावाला तू शिक म्हणत खंबीर पाठिंबा दिला. वडील आजारी, त्यात मोठा भाऊ शिक्षणासाठी बाहेर असताना शेती मोलमजुरी करत राजेशने घर सांभाळले तर नयन याला जमेल तशी मदत केल्याने नयन याला अभ्यास करताना भावाची मदत झाली.