पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वदेशीचा नारा , देशातील बाजारपेठ बळकट करण्याचे केले आवाहन

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन | टेक ऑफसाठी वाट पहावी लागणार

By Raigad Times    09-Oct-2025
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | देशातील बाजारपेठ बळकट होत आहे. आपण सर्वांनी ‘स्वदेशी’चा स्वीकार करणे गरजेचे आहे. देशाच्या पैशांचा उपयोग देशातील कामगारांना, उद्योगांना आणि तरुणांना लाभदायक त्यामुळे देशवासियांनी स्वदेशीचा अंगिकार करुन भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
 
वस्तू व सेवा करामधील बदलानंतर झालेल्या नवरात्रीतील विक्रमी खरेदीचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केला.बुधवारी (८ ऑक्टोबर) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला अर्पण, ‘मुंबई वन’या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अ‍ॅपचा शुभारंभ तसेच राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टच डिजिटल तोरणाने करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टर्मिनल इमारतीमधील सुविधांसह विमानतळाच्या त्रिमितीय रचनेची पाहणी केली. उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्ष विमान झेपावण्यासाठी आणखी दोन महिने वाट पहावी लागणार आहे.
 
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख
मराठीतून भाषणाची सुरूवात करून प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे पुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांनी समाजासाठी, शेतकर्‍यांसाठी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन समाजसेवेचे काम करणार्‍यांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असा दि.बा. पाटील यांचा गौरवपूर्ण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशाचा अभिमान
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन कमळाच्या आकारात असून ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, लघुउद्योग व निर्यातदार थेट युरोप, मध्यपूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील. त्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि शेतकर्‍यांच्या होणार आहे.
 
राज्यातील फळे, भाजीपाला व मासे निर्यातीला युरोप व इतर देशात नवीन बाजारपेठ मिळेल. यामुळे नवीन गुंतवणूक आणि उद्योग वाढेल. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज ही संख्या १६० च्या पुढे गेली आहे. उडान योजनेंतर्गत लाखो सामान्य नागरिकांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे. भारत आता तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक करणारा देश बनला आहे.
 
विमान उत्पादक कंपन्यांकडे सध्या एक हजारहून अधिक नव्या विमानांच्या निर्मितीची मागणी आहे. त्यामुळे पायलट्स, इंजिनीअर्स, केबिन क्रू आणि देखभाल, दुरुस्ती व तपासणी (एमआरओ) सुविधांमुळे हजारो रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
तरुणांसाठी रोजगार, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
पीएम योजनेद्वारे देशभरातील आयटीआय संस्थांना उद्योग क्षेत्राशी जोडले जात आहे. ७ हजार कोटी रुपयांच्या या योजनेंतर्गत ड्रोन, रोबोटिक्स, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेकडो आयटीआय व तांत्रिक शाळांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.